काँग्रेसचा हात सोडून सुनील जाखड भाजपामध्ये दाखल

नवी दिल्ली : गुजरात पाठोपाठ आता पंजाबमध्ये देखील काॅंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाब काॅँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीत हा प्रवेश झाला. जाखड यांच्या प्रवेशाने भाजपची पंजाबमधील ताकद वाढणार आहे.

सुनील जाखड यांना पक्षाचे सदस्यत्व देताना जेपी नड्डा म्हणाले की, काँग्रेसमध्ये असतानाही ते वेगळ्या प्रतिमेचे नेते आहेत. सुनील जाखड यांनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी काम केले. आज पंजाबमधील राष्ट्रवादी शक्तींमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. मला खात्री आहे की त्यांच्यासोबत भाजपा पंजाबला एका नव्या उंचीवर नेईल. यामध्ये सुनील जाखड महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

दरम्यान सुनील जाखड यांनी काही दिवसांपूर्वी अनुशासनहीनतेची नोटीस आल्यानंतर काँग्रेस सोडली होती. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसवर बरीच टीका केली होती. जाखड यांचे कुटुंब जवळपास ५० वर्षे काँग्रेसमध्ये होते. सध्या त्यांचे तिसर्‍या पिढीतील पुतणे संदीप जाखड काँग्रेसचे आमदार आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर बहुतांश आमदार त्यांच्या बाजूने असल्याचा आरोप सुनील जाखड यांनी केला होता. असे असतानाही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले नाही. त्यामागचे कारण म्हणजे सोनिया गांधींच्या जवळच्या अंबिका सोनी. यापूर्वी काँग्रेसने जाखड यांना हटवून नवज्योत सिद्धू यांना प्रमुख केले होते. यानंतर नाराज होऊन जाखड हे सक्रिय राजकारणापासून दूर गेले होते.

Share