मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी परिसरातील शाही ईदगाह मशीद हटवा; न्यायालयात याचिका दाखल

लखनौ : उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केल्यानंतर आता श्रीकृष्ण जन्मभूमीची चर्चा सुरू झाली आहे. मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी परिसरातील शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी करणारी याचिका लखनौ न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. या याचिकेत शाही ईदगाह मशीद श्रीकृष्ण जन्मभूमीवर बांधल्याचा दावा करण्यात आला आहे.

आधी लखनौ न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. मात्र, याचिकाकर्त्यांनी मथुरा न्यायालयात याला आव्हान दिले. यावेळी मथुरा न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेण्यासारखी असल्याचे म्हटले. यानंतर लखनौ न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे.

याचिकाकर्त्यांनी शाही ईदगाह मशीद श्रीकृष्ण जन्मभूमीवर बांधली असल्याचा दावा केला असून, ही मशीद श्रीकृष्ण जन्मभूमीवर बांधली असल्याने ती हटवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मथुरा न्यायालयाने या प्रकरणाची पुराव्यांच्या आधारे सुनावणी घेण्यास सांगितले आहे. मथुरा न्यायालयाने या प्रकरणी श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद प्रकरणाचा निकाल १९ मेपर्यंत राखीव ठेवला होता. लखनौच्या रहिवासी रंजना अग्निहोत्री यांच्यासह इतर सहा जणांनी या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी एकूण ३ याचिका दाखल आहेत. त्यापैकी दुसरी याचिका हिंदू आर्मी प्रमुख मनिष यादव आणि तिसरी याचिका इतर ५ जणांनी वकील महेंद्र प्रताप सिंह यांच्या माध्यमातून दाखल केली आहे.

श्रीकृष्ण जन्मभूमीवर बांधण्यात आलेली शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी फार जुनी आहे. २०२० मध्ये न्यायालयाने ही मशीद हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. कटरा केशव देव मंदिराच्या १३.३७ एकर परिसराच्या आत असलेली मशीद हटवण्यासाठी अनेक हिंदू संघटनांनी याआधीच मथुरेतील न्यायालयात १० वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या.

मथुरा येथील एका न्यायालयात श्रीकृष्ण जन्मभूमीच्या १३.३७ एकर परिसर जागेची मालकी मिळवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. १ जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे. याचिकेत २.३७ एकर इतकी जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीचा भाग असलेल्या १३.३७ एकर जमिनीपैकी ११ एकर परिसरात सध्या जन्मस्थान आहे.

मुघल बादशाह औरंगजेबाच्या आदेशाने १६६९ ते १६७० दरम्यान ही मशीद बांधण्यात आलेली आहे. तसेच ही १३.३७ एकर जमीन कटरा केशव देव मंदिराच्या मालकीची असल्याचे या याचिकांमध्ये म्हटले आहे. मथुरा कोर्टात दाखल याचिकेत असे म्हटले आहे की, हिंदूंचा असा विश्वास आहे की, श्रीकृष्णाचा जन्म त्याच ठिकाणी झाला होता जेथे ही मशीद आहे.

याचिकेत असे म्हटले आहे की, श्रीकृष्ण जन्मभूमी परिसराचा सर्व्हे करून त्याचा रिपोर्ट सादर केला जावा. ज्या ठिकाणी मशीद आहे तेथे कृष्णाचा जन्म झाला होता. मशिद असलेल्या ठिकाणी तुरुंग होते आणि तेथेच कृष्णाचा जन्म झाला होता. याचिकेत २.३७ एकर जमीन मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या एकूण १३.३७ एकर जागेपैकी ११ एकर जागेवर सध्या श्रीकृष्ण जन्मभूमी आहे, तर शाही ईदगाह मशीद २.३७ एकर परिसरात आहे.

Share