३४ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका; एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

चंदीगड : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना ३४ वर्षांपूर्वीच्या एका जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. १९८८ मध्ये घडलेल्या ‘रोड रेज’ प्रकरणी सिद्धू यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावली आहे. यापूर्वीच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने एक हजार रुपयांचा दंड भरून त्यांची सुटका केली होती; पण आता निकाल बदलल्याने एकतर सिद्धूंना अटक होईल किंवा त्यांना शरण यावे लागेल. आता सिद्धूंना या प्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. ही घटना २७ डिसेंबर १९८८ रोजी पतियालामध्ये घडली होती. पतियाळा येथे पार्किंगवरून सिद्धू यांचे गुरनाम सिंग नावाच्या ६५ वर्षीय व्यक्तीसोबत भांडण झाले होते. त्यावेळी सिद्धू यांनी रस्त्यावर जिप्सी उभी केली होती. गुरनाम सिंग आणि इतर दोघे बँकेतून पैसे काढण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यात जिप्सी दिसली आणि त्यांनी सिद्धू यांना ती काढण्यास सांगितले. त्यावरूनच वाद सुरू झाला. यावेळी सिद्धूंनी गुरनाम सिंग यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप आहे. नंतर गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले होते. पोलिसांनी नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदरसिंग सिद्धू यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

नंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी १९९९ मध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पीडित कुटुंबाने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी १ डिसेंबर २००६ रोजी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सिद्धू आणि त्यांच्या मित्राला दोषी ठरवले. ६ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने सिद्धू आणि संधू यांना तीन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. या शिक्षेविरोधात नवज्योत सिद्धूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. १६ मे २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना भादंविच्या कलम ३२३ अंतर्गत दोषी ठरवले होते. यासाठी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली नाही. केवळ एक हजार रुपयांचा दंड भरून त्यांची सुटका करण्यात आली होती.

१० जानेवारी २००७ पर्यंत सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. दोन्ही आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर ११ जानेवारी रोजी चंदीगड न्यायालयात आत्मसमर्पण केले. १२ जानेवारीला सिद्धू आणि त्यांच्या मित्राला सुप्रीम कोर्टातून जामीन मिळाला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मृताच्या कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाप्रमाणे सिद्धूला कलम ३०४ अंतर्गत शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारली आणि यावर आपला निर्णय बदलवत सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

टीव्ही शोमध्ये दिली होती हत्येची कबुली
नवज्योतसिंग सिद्धूच्या क्रिकेट करिअरचे ते सुरुवातीचे वर्ष होते. अपघाताच्या वेळी तो अवघा २५ वर्षांचा होता. १९८३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर सिद्धूला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी आणखी चार वर्षे वाट पाहावी लागली. १९८७ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी हा प्रकार घडला. या प्रकरणामुळे निवडणूक लढविण्याबाबत आक्षेपही नोंदविण्यात आला होता. त्यांना नंतर सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. सिद्धूंनी गुरनाम यांची हत्या केल्याचे एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात मान्य केल्याची सीडी मृत गुरनाम सिंहच्या नातेवाईकांनी २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

Share