औरंगाबाद : शहरातील पुंडलीकनगर भागात पती-पत्नीचे घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपुर्वी शहरात भरदिवसा तरुणीला ओढून नेत तिचा खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता या दांपत्याच्या हत्येने शहर पुन्हा एकदा हादरले आहे. शामसुंदर हिरालाल कलंत्री (वय.५५) आणि किरण शामसुंदर कलंत्री (वय.४५) असे मृत दांपत्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कलंत्री यांच्या घरातून दुर्गंध येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी याबाबत पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी घरात जाऊन पाहिले असता पती-पत्नीचे मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाखाली आढळून आले. ज्याप्रकारे हे मृतदेह लपवून ठेवण्यात आले होते. त्यावरुन हे खून त्यांच्या जवळच्या व्यक्तीनेच केले असावे असा अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. दरम्यान या दांपत्याचा मुलगा घटनेपासून फरार आहे. त्याचा फोन ही बंद येत आहे. याबाबत पोलीसांचा सविस्तर तपास सुरु आहे. मात्र, सतत घडणाऱ्या या खुनाच्या घटनेने नागरिकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.