‘उंटाच्या तोंडात जिरे’; इंधन कपातीवरुन फडणवीसांची टीका

मुंबई : केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला. परिणामी राज्यात पेट्रोल २ रु ८ पैशांनी तर डिझेल १ रु ४४ पैशांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

फडणवीस ट्वीट मध्ये म्हणतात की, इंधन दरकपात करताना केंद्र सरकारने २,२०,०००कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा १५%! इंधन दर कपातीत किमान १०% तर भार घ्यायचा. पण नाही! याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’! असे फडणवीस म्हणाले.

 

पुढे ते म्हणाले, अन्य राज्य सरकारे ७ ते १० रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने १.५ आणि २ रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते, असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

Share