मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यसभा निवडणुकीत पाठिंब्यासाठी संभाजीराजे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची अट घालण्यात आली होती; पण संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेने दिलेला हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. ते आज सोमवारी पहाटेच कोल्हापूरला रवाना झाले आहेत.
राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी अट घालण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. संभाजीराजे छत्रपती यांना आज सोमवारी दुपारी १२ वाजता ‘मातोश्री’वर शिवबंधन बांधण्यासाठी या, असा निरोप देण्यात आला होता. संभाजीराजे आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र, राज्यसभा निवडणूक अपक्ष लढण्यावर ठाम असलेल्या संभाजीराजे यांनी शिवसेनेचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर ते आज पहाटेच कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. संभाजीराजे यांचे सर्व कार्यकर्तेही कोल्हापूरला परतले आहेत. संभाजीराजेंनी शिवसेनेच्या पक्ष प्रवेशासाठी दिलेल्या निमंत्रणाकडे पाठ फिरवल्याची चर्चा रंगली आहे.
मराठा क्रांती मोर्चा सक्रिय होणार
कालच शिवसेना नेते अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि उदय सामंत यांनी ‘ट्रायडंट’ हॉटेलमध्ये जाऊन संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली होती. सोमवारी दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधायला ‘मातोश्री’वर या, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना पाठवला होता. या तिन्ही नेत्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना ठाकरे यांचा निरोप दिला होता. मात्र, आता संभाजीराजे यांनी शिवसेनेचा हा प्रस्ताव नाकारल्याचे स्पष्ट झाले असून, ‘मातोश्री’वर आज संभाजीराजे यांच्या शिवबंधनाचा कार्यक्रम होणार नाही, हे निश्चित झाले आहे. या साऱ्या घडामोडीनंतर आता मराठा क्रांती मोर्चा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढारे यांनी आज दुपारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत एखादा महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. संभाजीराजे छत्रपती हेदेखील मराठा समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
शरद पवारांचे घूमजाव
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने संभाजीराजे यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला होता; पण नंतर पवारांनी आपल्या भूमिकेवरून घूमजाव केले आहे. राज्यसभा निवडणुकीत एका जागेवर आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यानंतर उरलेली अतिरिक्त मते ही आम्ही शिवसेनेलाच देऊ, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. पवारांच्या या बदललेल्या भूमिकेवरून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून द्याव्याच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही ३१ तारखेपर्यंत आहे. या ६ पैकी दोन जागांवर भाजप, तर उर्वरित तीन जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उमेदवार सहजपणे निवडून येईल. सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे याच सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावा सांगितला आहे.
शिवसेना दोन जागा लढविणार
राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपच्या वतीने सहा वर्षांपूर्वी राज्यसभेवर संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणूनच सहा वर्षे खासदारकी भूषविली. यावेळीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. या जागेवर निवडून येण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय आमदारांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
संभाजीराजेंची भूमिका
संभाजीराजे छत्रपती हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नाहीत. याउलट महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, असा प्रस्ताव त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीकडे दिला आहे. दुसरीकडे सहाव्या जागेसाठी शिवसेना कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे, तर संभाजीराजेंनी शिवसेना प्रवेशाचा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, संभाजीराजे कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.