पुणे : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ ला दहशतवादी हल्ला झाला तेव्हा हेमंत करकरे यांचा निकृष्ट बुलेटप्रूफ जॅकेटमुळे मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या चौकशीत हे बोगस जॅकेट ज्या कंपनीने पुरवले त्यात शिवसेना नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या मुलाची भागीदारी असल्याचे समोर आले आहे, असा खळबळजनक आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केला. यशवंत जाधवांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीदेखील व्यावसायिक भागीदारी आहे, असे सांगत या प्रकरणात सोमय्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच संशय व्यक्त केला.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज (२४ मे) पुण्यात पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा अनेक गंभीर आरोप केले. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले आहे. शिवसेना नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव हे विमल अग्रवाल यांचे पार्टनर होते. अग्रवाल यांचा बुलेटप्रूफ जॅकेट घोटाळा कुप्रसिद्ध आहे. कसाब प्रकरणानंतर हा घोटाळा उघडकीस आला. यशवंत जाधव यांच्या ५३ इमारती आयकर विभागाने बेनामी संपत्ती म्हणून घोषित केली आहे. विमल अग्रवाल यांनी यशवंत जाधव यांच्याशी भागीदारी केली. समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे. या भागीदारी कंपनीने बद्री इन्फ्रा प्रोजेक्ट्सकडून ८० कोटी रुपयांची मलबार हिल येथील एक मालमत्ता विकत घेतली. विशेष म्हणजे समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्सचे उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी आर्थिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. समर्थ इरेक्टर्सने टीडीआरचे व्यवहार केले. उद्धव ठाकरे, यशवंत जाधव, बुलेटप्रूफ जॅकेट घोटाळ्यातील विमल अग्रवाल, श्रीधर पाटणकर यांचे आपापसांत व्यावसायिक संबंध असल्याचे सिद्ध होत आहे, असा हल्लाबोल किरीट सोमय्यांनी केला आहे.
VIDEO: हेमंत करकरे यांच्या हत्येप्रकरणी किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप#KiritSomaiya #HemantKarkare #Mumbai @KiritSomaiya pic.twitter.com/L4nDvDTQFM
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू 🇮🇳✊ (@PravinSindhu) May 24, 2022
किरीट सोमय्या म्हणाले, मी फार जबाबदारीने जाणीवपूर्वक सांगतोय की, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गँगपर्यंत पोहचू शकतात, तर उद्धव ठाकरे यांच्या भागीदारांचे संबंध अजमल कसाबपर्यंत आहेत. त्यांचे संबंध कसाबचे कटकारस्थान करणाऱ्या लोकांपर्यंत आहेत. उद्धव ठाकरे, ठाकरे परिवार यांच्याशी व्यावसायिक संबंध असणाऱ्यांचा संबंध हेमंत करकरे यांची हत्या करणाऱ्यांशी आहे. हेमंत करकरे यांची हत्या दोन कारणांमुळे झाली. ही हत्या कसाबच्या सहकाऱ्यांनी, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी केली. मात्र, हेमंत करकरे यांचा मृत्यू बुलेटप्रुफ जॅकेट बोगस असल्याने झाला. त्या बुलेटप्रुफ जॅकेटचा पुरवठा विमल अग्रवाल याने केला होता. त्याची चौकशी झाली, कमिट्या नेमल्या गेल्या. विमल अग्रवालला अटक झाली, असे सोमय्या यांनी सांगितले.
हसन मुश्रीफांविरोधात कारवाईला सुरुवात
राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी आरोपांची राळ उठवली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. हसन मुश्रीफ यांच्या बेनामी संपत्तीप्रकरणी आयकर विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे, असे सांगून सोमय्या म्हणाले, हसन मुश्रीफ यांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या मदतीने १५८ कोटींचे मनी लॉड्रिंग केले आहे. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे असलेल्या ९० कोटींच्या बेनामी मालमत्तेवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात आयकर विभागाने त्यांनी तीन वेळा नोटीसा बजावल्या. मात्र, त्यांनी एकदाही उत्तर दिले नाही, असे सोमय्यांनी सांगितले.
शरद पवारांनी उत्तर द्यावे
हसन मुश्रीफ यांच्या जेन कन्स्लटेशनने ४० हजार शेतकऱ्यांकडून १६ कोटी रुपये जमा केले, असा आरोपही यावेळी किरीट सोमय्या यांनी केला. शेतकऱ्यांचे नेते असलेले शरद पवार याप्रकरणी गप्प का? असा सवालही त्यांनी केला. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून हसन मुश्रीफ यांनी उलटी गिनती सुरू करावी, असे सोमय्या म्हणाले.
पुढचा नंबर अनिल परबांचा
रत्नागिरी जिल्ह्यातील बेकायदा रिसॉर्ट आणि हॉटेलप्रकरणी लवकरच राज्याचे परिवहनमंत्री व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे अनिल परब जेलमध्ये जातील, असा दावाही किरीट सोमय्यांनी केला. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यानंतर आता पुढचा नंबर अनिल परब यांचाच असल्याचे ते म्हणाले. या रिसॉर्टच्या बांधकामांमध्ये अनेक अनियमितता आढळल्या आहेत. पर्यावरण विभागाने याची गंभीर दखल घेतली असून लवकरच याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असे सोमय्या यांनी सांगितले.