ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी

लखनौ : ज्ञानवापी मशीद प्रकरणी वाराणसी येथील जिल्हा न्यायालयात आज मंगळवारी सुनावणी पार पडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी, २६ मे रोजी होणार आहे. मुस्लिम पक्षाच्या बाजूच्या याचिकेवर ७ -११ सीपीसी अंतर्गत याचिकांवर न्यायालय पुढील सुनावणी घेणार आहे. न्यायालयाने हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही पक्षांना आयोगाच्या अहवालावर आक्षेप नोंदवून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशीद वादाची सुनावणी वाराणसी जिल्हा न्यायायाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कुमार यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. सुमारे ४५ मिनिटे सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली होती. आज वाराणसी जिल्हा न्यायालयात या प्रकरणात सुनावणी पार पडली. न्यायमूर्तींनी अ‍ॅडव्होकेट कमिशनरच्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण अहवालावर हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही पक्षांकडून आक्षेप मागवले आहेत. सर्वेक्षण अहवालावर आक्षेप मागवायचे की, मशीद समितीच्या आदेश नियम ७-११ अर्जावर आधी सुनावणी घ्यायची याबाबत न्यायालय आज आदेश देणार होते. सुनावणीदरम्यान खटला प्रार्थनास्थळ कायद्यांतर्गत प्रतिबंधित असल्याचा युक्तिवाद मस्जिद समितीने केला आहे, तर हिंदू याचिकाकर्त्यांनी सर्वेक्षण अहवालाचा विचार केला पाहिजे असे म्हटले आहे.

ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणानंतर अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पाहणी अहवालात ज्ञानवापी मशिदीत कमळ, सापाची फणा आणि अनेक प्रकारच्या हिंदू खुणा आढळून आल्याचेही सांगण्यात आले आहे, तर दुसरीकडे काशी विश्वनाथ मंदिरानेदेखील ज्ञानवापी मशिदीच्या तळमजल्यावर दुसरे शिवलिंग असल्याचा दावा केला आहे.

Share