संजय राऊतांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवेल : मराठी क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यामुळे मराठा संघटनांमध्ये तीव्र नाराजी आहे. संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेने फसवल्याची भावना व्यक्त करीत मराठा क्रांती मोर्चाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. २०२४ च्या निवडणुकीत तुम्हाला याची राजकीय किंमत मोजावी लागेलच; पण संभाजीराजे छत्रपती अपक्षच निवडणूक लढवणार, असा इशारा मराठी क्रांती मोर्चाने दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने सुरुवातीला कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली होती. फक्त त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा व पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरावे, अशी अट संभाजीराजे यांना घातली होती; पण संभाजीराजेंनी ही अट धुडकावून लावत आपण अपक्ष म्हणूनच राज्यसभेची निवडणूक लढणार असल्याचे सांगत, महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका घेतली आहे. या साऱ्या घडामोडी घडत असतानाच शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची रणनीती आखली आहे. संजय पवार हे दुसऱ्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरत आहेत. मात्र, उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संभाजीराजे छत्रपती यांचा आम्ही सन्मान करतो; पण राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.

संभाजीराजेंना डावलून शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे
समजताच त्यांच्या समर्थकांकडून तसेच मराठा क्रांती मोर्चा व मराठा संघटनांकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली जात आहे. संजय राऊतांनादेखील लक्ष्य केले जात आहे.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओमधून संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “छत्रपतींच्या अपक्ष उमेदवारीला संजय राऊत सातत्याने विरोध करताना दिसत आहेत. एकीकडे प्रियंका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना कुठल्याही प्रकारच्या अटी-शर्ती न घालता राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दाखवता आणि ज्या छत्रपतींच्या नावावरती एवढी वर्षे राजकारण करत आहेत, सत्ता भोगत आहेत, त्यांनाच विरोध करता. या शिवसेनेचा ‘शिव’च आमच्या छत्रपतींचा आहे, असे असताना देखील संजय राऊत हे सातत्याने विरोध करताना दिसत आहेत, असे म्हणत अंकुश कदम यांनी शिवसेनेविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. २०२४ ला तुम्हाला याची राजकीय किंमत मोजावी लागेलच, असा इशाराही कदम यांनी संजय राऊतांना दिला आहे.

संजय राऊत काय म्हणतात?
संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीबद्दल नेमक्या काय घडामोडी घडल्या, याविषयी खा. संजय राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. खा.राऊत म्हणाले, गेल्या १५ दिवसांतल्या घडामोडी समजून घ्यायला हव्यात. छत्रपतींचा, त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा आम्ही संभाजीराजेंना द्यायला तयार झालो. यापेक्षा शिवसेना अजून काय करू शकते हे सांगावे. निवडणुकीत विजयासाठी ४२ मतांचा कोटा लागतो. ही ४२ मतं आम्ही छत्रपती संभाजीराजेंना द्यायला तयार झालो. आमची भूमिका इतकीच होती की, ही जागा शिवसेनेची आहे. आपण शिवसेनेचे उमेदवार व्हा. छत्रपती किंवा त्यांच्या कुटुंबाला राजकीय पक्षाचे वावडे असण्याचे कारण नाही. यापूर्वी स्वत: सीनिअर शाहू महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनीही काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मालोजीराजे भोसले यांनीदेखील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आहे. ते राष्ट्रवादीचे आमदार होते. स्वत: युवराज छत्रपती संभाजी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढले आहेत आणि पराभूत झाले आहेत. त्यामुळे छत्रपतींच्या घराण्यातले राजकीय पक्षात जात नाहीत हा त्यांच्या समर्थकांचा दावा योग्य नाही, असे राऊत म्हणाले.

४२ मते संभाजीराजेंना द्यायचे नक्की झाले होते
देशभरातील अनेक राजघराणी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षात जाऊन त्यांचे सामाजिक कार्य पुढे नेत असतात. ४२ मते संभाजीराजे छत्रपतींना देऊन राज्यसभेवर पाठवण्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नक्की केले होते. त्याबाबत त्यांच्याशी चर्चाही झाली होती. संभाजीराजेंच्या समर्थकांनी १५ दिवसांतल्या घडामोडी समजून घेतल्या पाहिजेत, अशा शब्दांत संजय राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे.

Share