राज ठाकरेंच्या धमकीनंतर अफझलखानच्या कबर परिसरात मोठा बंदोबस्त

सातारा : औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला वाद आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या धमकीनंतर सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानच्या कबरीभोवतालची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

यापूर्वी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी पोलिसांनी खबरदारीच्या दृष्टीने कडक बंदोबस्त ठेवला होता. छत्रपती संभाजी महाराजांना अनन्वित छळ करून ठार मारणाऱ्या मुघल शासक औरंगजेबाच्या खुलताबाद येथील कबरीबद्दल यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला होता.

काही दिवसांपूर्वी एआयएमआयएमचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेऊन फुले वाहिली होती. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बराच वाद झाला होता. ज्या औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली, त्या औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलांचे हार घालत आहेत आणि महाराष्ट्र शांत बसला आहे. सरकारने ही कबर पाडली नाही तर आमचे कार्यकर्ते ते पाडतील. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे पुरातत्व विभागाने पर्यटकांना पाच दिवस औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी जाण्यास बंदी घतली होती. पोलिसांनी खबरदारीच्या दृष्टीने तेथे कडक बंदोबस्त ठेवला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी पुण्यात सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अफझलखानाचा वध केला त्याच्या समाधी स्थळावर विशिष्ट समाजातील लोकांकडून पुष्पहार अर्पण केले जात आहेत. असे असताना महाराष्ट्र सरकार याकडे केवळ बघ्याची भूमिका घेत असून, यावर राज्य सरकारकडून योग्य ते पावले उचलण्यात न आल्यास मनसेकडून योग्य ती कारावाई केली जाईल, असा इशारा राज यांनी दिला आहे.

राज ठाकरेंच्या अफझलखानाच्या कबरीबाबतच्या वक्तव्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने तेथे तगडा बंदोबस्त लावला आहे. अफझलखानाची कबर महाबळेश्वरजवळ प्रतापगडाच्या पायथ्याशी असून, कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे या कबरीचेही आता छावणीत रूपांतर झाले आहे.

Share