वाराणसीतील ‘ज्ञानवापी’ नंतर आता राजस्थानातील अजमेर शरीफ दर्गा वादाच्या भोवऱ्यात

अजमेर : उत्तर प्रदेशमधील वाराणसीतील ज्ञानवापी, मथुरेतील इदगाह मशिदीनंतर आता राजस्थानातील अजमेर शरीफ दर्गा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त करून अजमेर येथील हजरत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती दर्गा बांधण्यात आला असल्याचा दावा महाराणा प्रताप सेनेने केला आहे. त्यामुळे आता यावरून नवीन वाद सुरू झाला असून, या दाव्यामुळे अजमेर शरीफ येथील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

महाराणा प्रताप सेनेचे राजवर्धन सिंह परमार यांच्या म्हणण्यानुसार, हजरत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती दर्ग्यातील भिंती आणि खिडकींवर हिंदू धर्माशी संबंधित चिन्हं आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने हजरत मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याचे सर्वेक्षण करण्याची मागणी राजवर्धन सिंह परमार यांनी केली आहे. ख्वाजा गरीब नवाज दर्गा याआधी एक प्राचीन मंदिर होते. या दर्ग्याच्या भिंतीवर आणि खिडकीवर स्वस्तिक चिन्ह आहेत, असे परमार यांनी म्हटले आहे. स्वस्तिकचे चिन्ह असणाऱ्या एका जाळीचा फोटो व्हायरल करून अजमेर दर्गा प्रत्यक्षात एक हिंदू मंदिर असल्याचा दावा परमार यांनी केला आहे.

महाराणा प्रताप सेनेने केलेल्या दाव्यात काहीही तथ्य नाही. दर्ग्यात कोणत्याही प्रकारचे चिन्ह नाहीत. हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक दर्ग्यात येतात. हा दर्गा ८५० वर्षांपूर्वीचा आहे, असे खादिम समितीचे अंजुमन सय्यद जादगानचे अध्यक्ष मोईन चिश्ती यांनी म्हटले आहे. असे खोटे दावे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सचिव वाहिद हुसैन अंगारा यांनी केली आहे. ऑल इंडिया कौम एकता समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. ए.एस.खान भारती व जिल्हाध्यक्ष बदरुद्दीन कुरेशी यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन पाठवून धार्मिक स्थळांविषयी अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Share