लडाखमध्ये लष्कराच्या गाडीला भीषण अपघात; ७ जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली : लडाखमधील तुरतुक सेक्टरमध्ये भारतीय सैन्य दलाचा ट्रक ६० फूट खोल नदीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ७ जवानांचा मृत्यू झाला असून, १९ जवान गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लष्कराचे २६ जवान शुक्रवारी सकाळी परतापूरहून हनीफ सब सेक्टरमधील फॉरवर्ड पोस्टकडे लष्कराच्या ट्रकमधून जात होते. थोइसपासून २५ किलोमीटर अंतरावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक ६० फूट खोल श्योक नदीत कोसळला. या ट्रकमध्ये २६ जवान होते. ही गाडी ५० ते ६० फूट खोल नदीत कोसळल्याने जवळपास सगळेच जवान जखमी झाले. सर्वच जवानांना लगतच्या चंडीमंदिर आर्मी फिल्ड रुग्णालयात हलवण्यात आले; पण तिथे उपचारादरम्यान ७ जवानांचा मृत्यू झाला. अन्य १९ जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक डॉक्टरांच्या मदतीसाठी लेह येथून तज्ज्ञांचे एक पथक परतापूरला पाठवण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमांडमध्ये हलवण्यात येत आहे.

हा अपघात कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. लष्कराने अद्याप तरी या अपघाताबद्दलची अधिकृत माहिती दिलेली नाही. भारतीय जवानांना घेऊन ट्रांझिस्ट कॅम्पहून सब सेक्टर हनिफला जात असताना हा अपघात झाला.

Share