राणा दाम्पत्य पुन्हा अडचणीत; नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल

अमरावती : हनुमान चालिसा पठणच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेल्या अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांना शक्ति प्रदर्शन करणे भोवले आहे. राणा दाम्पत्याच्या अमरावती आगमनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या स्वागत मिरवणुकीनंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, रात्री उशिरापर्यंत ध्वनिप्रदूषण करणे यासह विविध कलमांन्वये राणा दाम्पत्यासह १५ कार्यकर्त्यांच्या विरोधात राजापेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

तब्बल ३६ दिवसांनंतर आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांचे काल शनिवारी (२८ मे) अमरावतीत आगमन झाले. नागपूर ते अमरावती या प्रवासादरम्यान त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. अमरावती येथील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर राणा दाम्पत्याची स्वागत मिरवणूक राजकमल चौकात पोहोचली.‍ इर्विन चौकात राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते जमले होते; पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

राणा दाम्पत्याची स्वागत मिरवणूक राजकमल चौकात पोहोचल्यावर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राणा दाम्पत्याचे स्वागत भला मोठा हार घालून करण्यात आले. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी गदा फिरवून कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला प्रतिसाद दिला. राणा दाम्पत्याने रवीनगर परिसरातील हनुमान मंदिरात पोहचून हनुमान चालिसाचे पठण करीत आरतीत सहभाग घेतला. रात्री १० वाजेनंतरही या ठिकाणी लाऊडस्पीकरचा वापर सुरू होता, असा आक्षेप आहे.

राणा दाम्पत्य शंकरनगर परिसरातील निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला. राणा दाम्पत्याच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.‍ या स्वागत मिरवणुकीदरम्यान रस्ता अडवणे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणे आणि ध्वनिप्रदूषणासाठी कारणीभूत ठरणे, यासह विविध कलमांन्वये नवनीत राणा, रवी राणा आणि इतर १५ जणांच्या विरोधात राजापेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली.

Share