गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली गायक सिद्धू मुसेवालांच्या हत्येची जबाबदारी

चंदीगड : प्रसिद्ध पंजाबी रॅप गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला ऊर्फ शुभदीप सिंग सिद्धू यांची काल (रविवारी) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर सुमारे ३० राऊंड गोळीबार केला. त्यात ते जागीच ठार झाले. दुसरीकडे सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक बाब समोर आली आहे. पंजाबमधील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा कॅनडास्थित जवळचा सहकारी गोल्डी ब्रार याने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, पंजाब सरकारने मुसेवाला हत्याकांडाचा तपास एसआयटीकडे सोपवला आहे.

पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. अवघ्या २८ वर्षांच्या सिद्धू यांच्या हत्येने संपूर्ण पंजाब हादरला आहे. पंजाबमधील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा कॅनडास्थित साथीदार गोल्डी ब्रार याने मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. मुसेवाला यांच्यावर आठ हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा पोलिसांचा दावा आहे. घटनास्थळावरून तीन एके-९४ रायफलच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

शनिवारीच सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा व्यवस्था हटवण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला होता. मुसेवाला यांच्याकडे खाजगी सुरक्षा कर्मचारी आणि कमांडोना बुलेट प्रुफ वाहनेही होती. मात्र, खुनाच्या दिवशी म्हणजे रविवारी २९ मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास मुसेवाला हे घरातून बाहेर पडले. त्यांच्यासोबत गुरविंदर सिंग (शेजारी) आणि गुरप्रीत सिंग (चुलत भाऊ) हे दोघे होते. मुसेवालाकडे दोन सुरक्षा रक्षक होते; पण त्यांनी त्या दोघांना सोबत घेतले नाही. बुलेटप्रूफ वाहनाशिवायच ते थार गाडीने निघून गेले आणि मारेकऱ्यांचे लक्ष्य बनले. मुसेवाला यांच्यावर जवाहरके गावाजवळ हल्ला झाला तेव्हा त्यांचे दोन साथीदार गाडीत सोबत होते. काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या दोघा हल्लेखोरांकडून सिद्धू मुसेवाला यांच्यावर ३० राउंड गोळीबार करण्यात आला. रुग्णालयात दाखल करण्यातआधी सिद्धू यांचा मृत्यू झाला होता.

हत्येवेळी कमांडो सोबत नव्हते; ३० राउंड फायरिंग झाले
पंजाबचे डीजीपी व्ही. के. भावरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सिद्धू मुसेवाला यांच्यावर सुमारे ३० गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुसेवाला यांच्या मित्राचाही रुग्णालयात मृत्यू झाला. एक दिवस आधी पंजाब सरकारने सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा कमी केली होती. यापूर्वी त्याच्या संरक्षणात पंजाब पोलिसांचे चार कमांडो होते. त्याचवेळी सुरक्षा व्यवस्था कमी केल्यानंतर त्याच्यासोबत दोन कमांडो ठेवण्यात आले होते. मात्र, घटनेच्या वेळी दोन्ही कमांडो त्याच्यासोबत नव्हते. तसेच बुलेटप्रूफ वाहनाऐवजी मुसेवाला थार गाडीने जात होते.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई जबाबदार
गँगस्टर गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. गोल्डी ब्रार सध्या कॅनडामध्ये आहे. मुसेवाला यांच्या हत्येला गोल्डीब्रार आणि तुरुंगात असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई जबाबदार आहेत. या हत्येच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेत तीन शस्त्रे वापरण्यात आल्याचेही डीजीपी भावरा म्हणाले.

गोल्डी ब्रारने घेतली होती सिद्धू मुसेवालांच्या हत्येची जबाबदारी

गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी घेत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये गोल्डी ब्रारने लिहिले की, ‘आज मुसेवालाची पंजाबमध्ये हत्या करण्यात आली. मी, सचिन बिश्नोई, लॉरेन्स बिश्नोई याची जबाबदारी घेतो. हे आमचं काम आहे. आमचे बंधू विक्रमजीत सिंग मिदुखेरा आणि गुरलाल ब्रार यांच्या हत्येप्रकरणी मुसेवालाचे नाव पुढे आले होते; पण पंजाब पोलिसांनी मूसेवालावर कोणतीही कारवाई केली नाही. अंकितच्या एन्काउंटरमध्ये मुसेवालाचा सहभाग असल्याचे आम्हाला समजले. मुसेवाला आमच्या विरोधात काम करत होता. दिल्ली पोलिसांनी त्याचे नावही घेतले होते; पण मुसेवाला प्रत्येक वेळी राजकीय ताकदीचा वापर करून स्वतःला वाचवत होता.’

बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होता सिद्धू मुसेवाला
एका वृत्तानुसार, ७ ऑगस्ट २०२१ रोजी युवा अकाली दलाचे नेते विक्रमजीत मिदुखेरा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुसेवालाने या हत्येची जबाबदारी त्याचा मॅनेजर शगुनप्रीत सिंगला दिल्याचे सांगण्यात आले. या हत्येसाठी शगुनप्रीतने कौशल टोळीच्या सदस्यांना कामावर ठेवल्याचा आरोप आहे. तेव्हापासून शगुनप्रीत सिंग फरार झाला होता. त्यानंतर कौशल टोळीतील सदस्यांना अटक करण्यात आली. तेव्हापासून सिद्धू मुसेवाला गोल्डी ब्रारा आणि बिश्नोई गँगच्या रडारवर होता.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पंजाब विद्यापीठ कनेक्शन
वास्तविक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा पंजाब विद्यापीठ चंदीगडच्या विद्यार्थी राजकारणातून पुढे आला आहे. त्याचे पंजाबमध्ये दविंदर बंबीहा ग्रुपसोबत टोळीयुद्ध सुरू आहे. २०१६ मध्ये झालेल्या चकमकीत दविंदर बंबीहा मारला गेला होता. असे असतानाही त्याची टोळी अजूनही कार्यरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंबीहा ग्रुप आर्मेनियामध्ये बसलेला लकी पटियाल चालवत आहे. ७ ऑगस्ट २०२१ रोजी मोहाली इथे युवा अकाली नेते विक्रम सिंह उर्फ विकी मिड्डूखेडा यांची हत्या करण्यात आली होती. बंबीहा ग्रुपने सोशल मीडियावर सांगितले होतं की, विकी हा लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी काम करत होता, त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली.

 

Share