हार पचवायला ताकद लागते; बबनराव ढाकणेंच्या कौतुकोद्गाराने मुलाला अश्रू अनावर

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात सोमवारी एक हृदयस्पर्शी सोहळा पार पडला. माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी त्यांचे सुपुत्र प्रतापराव ढाकणे यांचा एका कार्यक्रमात स्वत:च्या हाताने हार घालून सत्कार केला. ‘तीन वेळा प्रतापचा सलग पराभव झाला; पण हार पचवायला ताकद लागते’, असे म्हणत बबनराव ढाकणे यांनी मुलाचे जाहीर कौतुक केले. वडिलांना आपल्याबाबत कौतुकोद्गार काढताना पाहून प्रतापरावांना गहिवरून आले आणि ते व्यासपीठावरच ढसाढसा रडले. प्रतापरावांनी रडत रडतच वडील बबनराव ढाकणे यांच्या पाया पडून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बापाचं (बबनराव ढाकणे) डोळ्यात पाणी आणणारं भाषण आणि हा प्रसंग पाहून कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे मन हेलावले.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव भागात केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी, इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी “महाराष्ट्रातील विधान मंडळातील बबनराव ढाकणे” या संपादित ग्रंथाचे प्रकाशनदेखील पवार यांच्या हस्ते पार पडले. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीने सहभागी झाले होते. या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने शेतकरी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

यावेळी भाषण करताना बबनराव ढाकणे भावनावश झाले होते. ते म्हणाले, “एक गोष्ट मला वाईट वाटते, मी अनेकांचा मित्र राहिलो, रस्ताभर फिरत राहिलो; पण कुटुंबाकडे मी दुर्लक्ष केलं. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. नातेवाई, मित्र, मुलं, नातवांचा माझ्यावर राग आहे. एवढं सगळं केलं आणि आम्ही कोण आहोत असं झालं. आता प्रतापच्याही जीवनात तोच संघर्ष आला आहे; पण त्या संघर्षाला तो कंटाळला नाही. तीनवेळा सलग पराभव झाला. सत्ता वगैरे काही नाही. सत्ता ही महत्त्वाची नव्हती. त्याच्याही पुढे संघर्ष आलाय, तुमच्या जीवावर उलटणार तो जोपर्यंत तुमची ताकद आहे तोपर्यंत, त्याचा कितीही वेळा पराभव होऊ द्या. मी कधी माझ्या मुलाबाळांना जवळ घेतलं नाही; पण आज त्याने चांगलं काम केलं. म्हणून मी हार घालून माझ्या मुलाचा सत्कार तुमच्यादेखत करणार आहे. अपयश पचवणं फार कठीण असतं. वेडा होतो माणूस; पण मी त्याला सांगू इच्छितो की, तुम्हा आम्हाला जी ताकद दिली आहे ती जनता-जनार्दनाने दिलेली आहे. पराभव पचवण्यातच सत्ता आहे”.

शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका

याप्रसंगी शरद पवार म्हणाले, “ढाकणे पिता-पुत्रांच्या मागे इथल्या जनतेने ठामपणे उभे राहण्याची गरज आहे, त्यांच्या संघर्षाला साथ द्या”. ब्राझिलमध्ये सध्या दुष्काळ आहे, त्यामुळे साखरेची मागणी वाढली आहे. मात्र, ज्यावेळी शेतकऱ्यांना संधी मिळते, अशावेळेस ज्याच्या हातात सत्ता आहे त्यांनीच साखरेची निर्यात बंदी केली आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांना संधी मिळते त्यावेळी सरकारची नियत बदलते. या देशातील शेतकऱ्यांना परदेशात साखर निर्यात करण्याची संधी होती. अशातच सरकारने साखर आणि गहू यांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, असे म्हणत पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

साखर आणि गहू निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा नाही
फक्त साखर एके साखर हे दिवस आता राहिले नाहीत. साखरेसोबत इथेनॉल, अल्कोहोल निर्मिती प्रकल्प कारखान्यांनी सुरू करणे गरजेचे आहे. केदारेश्वर साखर कारखान्याच्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उसाला दोन पैसे अधिक मिळतील. प्रतापराव ढाकणे यांनी हाती घेतलेला हा प्रकल्प नक्कीच या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल, असे पवार म्हणाले. आज साखर धंदा वेगळ्या वळणार आहे. देशातील शेतकऱ्यांना परदेशात साखर निर्यात करण्याची चांगली संधी होती. अशातच सरकारने साखर निर्यातबंदीचा निर्णय घेतला. तसेच गव्हाची निर्यातबंदी करण्याचाही निर्णय घेतला आहे. हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. हा प्रश्न आपण सरकार दरबारी मांडू, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

Share