नेपाळमध्ये ‘तारा एअरलाइन्स’ चे विमान कोसळले; घटनास्थळावरून २१ मृतदेह शोधण्यात यश

काठमांडू : नेपाळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या ‘तारा एअरलाइन्स’ चे विमान काल रविवारी सकाळी ज्या ठिकाणी कोसळले होते ते ठिकाण नेपाळ लष्कराने आज सोमवारी शोधून काढले. अपघात स्थळावरून विमानाच्या ढिगाऱ्यातून २१ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाकडून सोमवारी देण्यात आली.

‘तारा एअरलाइन्स’च्या ट्विन इंजिन ‘9 NAET’ या विमानाने २२ जणांसह पोखरा येथून रविवारी सकाळी ९.५५ वाजता उड्डाण केले होते. त्यानंतर अवघ्या १२ मिनिटांनंतर या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. त्यानंतर या विमानाचा युद्धपातळीवर शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. अपघातग्रस्त विमान हे विमान कॅनडाच्या डी हॅविलँडने बनवलेले होते, ज्याने ४० वर्षांपूर्वी पहिले उड्डाण केले होते.
बेपत्ता झालेले हे ‘तारा एअरलाइन्स’चे विमान मुस्तांग जिल्ह्यात क्रॅश झाले होते. या विमानात चार भारतीय, दोन जर्मन आणि १३ नेपाळी नागरिकांसह एकूण २२ जण होते. या अपघातात चार भारतीय नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेतील २१ जणांचे मृतदेह सापडले असून, एका बेपत्ता प्रवाशाचा शोध घेतला जात असल्याचे नेपाळ लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी ‘एएफपी’ला सांगितले. नेपाळच्या लष्कराला मुस्तांग जिल्ह्यात ‘तारा एअरलाइन्स’च्या दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहेत. रविवारी बर्फवृष्टीमुळे शोध मोहीम थांबवण्यात आली होती. मात्र, आज सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली.

विमान दुर्घटनेत चार भारतीयांचा मृत्यू
नेपाळमधील या विमान दुर्घटनेत चार भारतीयांचादेखील मृत्यू झाला आहे. हे भारतीय मूळचे महाराष्ट्रातील ठाणे येथील असून, यामध्ये अशोक कुमार त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर हे विभक्त दाम्पत्य तसेच धनुष आणि रितिका या त्यांच्या मुलांचा समावेश आहे. अशोक कुमार आणि वैभवी हे विभक्त दाम्पत्याला दरवर्षी सुट्टीवर जाण्याचे निर्देश कौटुंबिक न्यायालयाने दिले होते. त्यानुसार हे दोघेही यंदा नेपाळ येथे पर्यटनासाठी गेले होते;. परंतु त्यातच हा अपघात घडला.

Share