नवोदित अभिनेत्रीचा भररस्त्यात गोंधळ; महिला पोलिसाच्या बोटाचा घेतला चावा

पुणे : हाॅटेलचालकाशी वाद झाल्याने एका नवोदित अभिनेत्रीने भररस्त्यात गोंधळ घातल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी भागात घडली. यावेळी समजावून सांगणाऱ्या महिला पोलिसाच्या बोटाला या अभिनेत्रीने चावा घेतला. शुक्रवारी (१ जुलै) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. काकुली विश्वास (वय २८, सध्या रा. अंधेरी, मुंबई, मूळ रा. बंगळुरू) असे या अभिनेत्रीचे नाव आहे. सरकारी कामात अडथळा आणणे तसेच महिला पोलिसाच्या बोटाला चावा घेतल्याप्रकरणी पॉलिसांनी या अभिनेत्रीला अटक केली आहे.

याप्रकरणी महिला पोलिस शिपाई परवीन शेख यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी अभिनेत्री काकुली विश्वास हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकुली विश्वास ही नवोदित अभिनेत्री आहे. तिने काही वेबसिरीजमध्ये काम केले आहे. ती काही कामानिमित्त पुण्यात आली होती. तिने वडगाव शेरी परिसरातील एक हाॅटेलमधील रूम ऑनलाईन बुक केली होती. मात्र, तेथील सुविधा तिला आवडल्या नाहीत. त्यामुळे तिने पैसे परत मागितले. या कारणावरून तिने हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती हाॅटेल व्यवस्थापनाने पोलिसांना दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या दामिनी पथकातील महिला पोलिस तेथे गेल्या. त्यांनी काकुली विश्वास हिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

हाॅटेलसमोरील रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या काकुलीला महिला पोलिसांनी गाडीत बसण्यास सांगितले. त्यावेळी तिने दामिनी पथकातील पोलिस कर्मचारी परवीन शेख यांच्याशी वाद घालून झटापट केली. तसेच शेख यांच्या बोटाचा चावा घेतला. सरकारी कामात अडथळा आणणे तसेच दुखापत केल्याप्रकरणी काकुली विश्वास हिला अटक करणात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक मंजुषा मुळुक यांनी दिली.

Share