शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणी राज्याचे माजी मंत्री अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम ४२० अन्वये दापोली पोलिसांनी या गुन्ह्याचीं नोंद केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्वीट केले आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की,  कलम ४२० अंतर्गत दापोली पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा करण्यात आला आहे. ‘खोटी कागदपत्रं सादर करून फसवणुकीचा ठपका’ ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी ट्विट करून दिली.

नेमकं प्रकरण काय?
अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टच्या जमीन खरेदी व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्यांकडून सातत्यानं करण्यात येत आहे. या रिसॉर्टच्या आर्थिक व्यवहाराचा उल्लेख अनिल परब यांनी चार वर्षांपूर्वी जुलै २०१८ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या शपथपत्रात केला होता. या रिसॉर्टच्या वीज जोडणीसाठी अर्ज करतानाच त्यांनी घरपट्टीही भरली होती, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. दरम्यान, या आरोपानंतर ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सुरू आहे. या रिसॉर्टशी काहीही संबंध नसल्याचं परब यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Share