समाजात तेढ निर्माण होईल असे व्हिडीओ करणाऱ्या यु-ट्युब चॅनेलवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : सोशल मिडीयावर धार्मिक-जातीय तणाव निर्माण करुन शत्रुत्व वाढवून सामाजिक एकोपा व सार्वजनिक शांतता भंग व्हावी, या उद्देशाने व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या एका यू-ट्यूब चॅनेलचा संपादक आणि अँकरविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा व सायबर पोलिसांनी मिळून ही कारवाई केली आहे.

‘तहफूज-ए-दिन इंडिया’ असे यू-ट्यूब चॅनलचे नाव आहे. अँकर सय्यद फारुक अहमद याने व्हिडिओ तयार केला तर चॅनलचे संपादक कारी झियाउर महफुजुर रहमान फारुकी याने प्रसारित केला होता. पोलीसांनी दिलेल्या  माहितीनुसार,  सायबर पोलीस ठाण्याच्या सोशल मीडिया सेलचे पोलिस उपनिरीक्षक राहुल चव्हाण सोशल मीडिया पेट्रोलिंगचे काम करीत असतानाच आयुक्तालयाच्या व्हॉटसअ‍ॅपवर आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांच्या निदर्शनास आला. त्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा पद्धतीची माहिती होती. दोन धर्मात अथवा निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढेल आणि एकोप्यास बाधा निर्माण होईल, तसेच सार्वजनिक शांततेविरुद्ध व लोकांमध्ये भिती निर्माण होईल. याची जाणीव असताना चिथावणी देण्याच्या उद्देशाने तो व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारीत केल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Share