सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनच गुंडगिरी; मुख्यमंत्री मूग गिळून गप्प!

मुंबई : महाराष्ट्रात भाजप नेत्यांवर हल्ले होत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. सरकारमधील सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असून, गुंडगिरी सुरू आहे. मुख्यमंत्री मात्र मूग गिळून बसले आहेत, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सध्या राज्यात अराजक सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. अलिकडच्या काळातील जर सर्व घटना पाहिल्या तर एका सेकंदात राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, अशी स्थिती असल्याचे दरेकर यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी शिवसेनेचे कार्यकर्तेच रस्त्यावर उतरून गुंडगिरी करीत आहेत, तर दुसरीकडे भाजप नेते मोहित कंबोज यांच्या कारवर मुंबईत शुक्रवारी रात्री दगडफेक करत हल्ला करण्यात आला. यावरून भाजप आक्रमक झाला आहे. जशास तसे उत्तर देण्याची ताकद आमच्यातही आहे, असा इशारा विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी दिला आहे.

 

पोलिसांच्या सहकार्याने सरकारने उच्छाद मांडला
भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शु्क्रवारी रात्री वांद्रे परिसरात ‘मातोश्री’बाहेर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. कायदा हातात घेण्याचे काम सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत, गुंडगिरी सुरू आहे. दहशत माजवली जात आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते रस्‍त्‍यावर उतरुन आमदार रवी राणा, खा. नवनीत राणा यांना ‘मातोश्री’ वर जाण्यापासून अडवत आहेत. राज्‍यात भाजप नेत्‍यांवर हल्‍ले हाेत आहेत. अशावेळी पाेलिस बघ्‍यांची भूमिका घेत आहेत. राज्यातील पोलिस प्रशासन आणि गृह खाते गप्प का ? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. पोलिसांच्या सहकार्याने सरकारने उच्छाद मांडला आहे. महाविकास आघाडीचे सरकार जाणीवपूर्वक भाजपला टार्गेट करत आहे, असा आराेपही त्‍यांनी केला. आम्ही आता मुंबईच्या पोलिस आयुक्तांना निवेदन देणार असल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

आम्‍हीही जशास तसे उत्तर देऊ -आ. आशिष शेलार
यावेळी आ. आशिष शेलार म्‍हणाले, शिवसेनेच्‍या भ्रष्टाचाराची पाेलखाेल आम्‍ही करत असल्‍याने शिवसेना आम्‍हाला टार्गेट करत आहे. भाजप नेत्‍यांवर भ्‍याड हल्‍ले सुरु आहेत. मोहित कंबोज यांच्या गाडीवर शु्क्रवारी रात्री ‘मातोश्री’बाहेर हल्ला झाला. शिवसेनेचे नेतेही कधीतरी एकटे फिरताना दिसतील. अंधारातून दगडं येऊ शकतात. जशास तसे उत्तर आम्हालाही देता येते; पण आम्ही संयम राखून आहोत आणि कायदा हातात घेणार नाही. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे मोडकळीस आली आहे. राज्यात पक्षपात केला जात आहे. धनंजय मुंडेंवर महिलेने आरोप केले; पण त्यांना वेगळा न्याय दिला गेला. गणेश नाईकांवर कारवाई केली जात आहे. गृह विभागाकडून राज्यात पक्षपात सुरू आहे, असा गंभीर आरोप आ. शेलार यांनी केला. महाराष्ट्रात सध्या अराजकतेची स्थिती आहे. मोहित कंबोज आणि भाजपच्या पोलखोल रथावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपचे शिष्टमंडळ गृहमंत्र्यांना भेटणार आहे, अशी माहिती आ. शेलार यांनी दिली.

Share