छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरुर तालूक्यातील वढू (बु) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे आतंरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आ. अशोक पवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधानसचिव विकास खारगे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज आपल्या हृदयात आहेतच. त्यांचे स्मारक देखील मनाचा ठाव घेणारे आकर्षक आणि भव्य असावे. संभाजी महाराजांचे आयुष्य संघर्षमय असे होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ उतार होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वांच्या घटनांचे प्रतिबिंब हे स्मारक पाहणाऱ्यांच्या मनात उमटावेत इतके भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असे स्मारक असले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनां सादर केल्या जाव्यात. त्या त्रिमितीय स्वरुपात सादर करण्यात याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Share