एखाद्या माणसानं इतकंही दुटप्पी वागू नये – अजित पवार

पुणे : राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ते बारामतीत बोलत होते

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, राज ठाकरेंचा आरोप हा धादांत खोटा आणि बिनबुडाचा आहे. त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला माहिती आहे की, पवार साहेबांचं नाव घेतलं की ती बातमी होते. पण राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे योग्य वाटत नाही. राज साहेब ज्यावेळेस पवार साहेबांची मुलाखत घेत होते तेव्हा साहेबांच्याबद्दल काय बोलत होते. म्हणजे इतकं दुटप्पी माणसाने वागू नये.

पवार साहेबांना उभा महाराष्ट्र ५५ वर्ष ओळखतोय. नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार हाच डोळ्यासमोर ठेवला आणि तशाच पद्धतीने सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम केलं. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे खरं तर हास्यास्पद बाब आहे. त्यांच्या आरोपात नखभर देखील तथ्य नाही. असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरेंचा नेमका आरोप काय ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर गंभीर आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झाले. शरद पवार नेहमी आपल्या भाषणात शाहू, फुले आंबेडकरांचे नाव घेतात पण त्यांनी कधीच शिवाजी महाराजांचे नाव घेतलं नाही. त्यांची जुनी भाषणं काढून पहा ते शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत कारण महाराजांचे नाव घेतलं कि मुस्लिम मते जातील असे ते म्हणाले.
Share