हिराबेन यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्याकडून मिळणार खास गिफ्ट

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचा यंदा शंभरावा वाढदिवस आहे. हिराबेन मोदी यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त हिराबेन यांना पंतप्रधान मोदी यांच्याकडून खास गिफ्ट मिळणार आहे. शताब्दी वर्षानिमित्त गांधीनगर येथील एका रस्त्याला हिराबेन यांचे नाव देण्यात येणार आहे. उद्या शनिवारी (१८ जून) पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर असून ते आई हिराबेन मोदी यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहणार आहेत.

गुजरातमधील गांधीनगर येथील घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचा १०० वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. हिराबेन मोदी या आपल्या धाकट्या मुलासोबत गांधीनगर शहराच्या बाहेरील रायसन गावात राहतात. तिथेच त्यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. तसेच वाढदिवसानिमित्त वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात पूजेचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. दरम्यान, वाढदिवसानिमित्त हिराबेन मोदी यांना पंतप्रधान मोदींकडून खास गिफ्ट मिळणार आहे. हिराबेन यांच्या शताब्दी वर्षानिमित्त गांधीनगर येथील रायसन पेट्रोल पंपाजवळीच ८० मीटर रस्त्याला पूज्य हिराबेन मार्ग असे नाव दिले जाणार आहे. हिराबेन मोदी यांचे नाव येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हाच यामागचा उद्देश आहे, अशी माहिती गांधीनगरचे महापौर हितेश मकवाना यांनी दिली.

या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह इतर नामवंत कलाकारही उपस्थित राहणार आहेत. हिराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलांनी वडनगरमध्येही मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. हिराबेन शताब्दीकडे वाटचाल करत असताना आम्ही वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात नवचंडी यज्ञ आणि सुंदरकांड पठणाचे आयोजन केले आहे. यावेळी मंदिरात संगीत संध्याचेही आयोजन करण्यात आले आहे, असे हिराबेन यांचे पुत्र प्रल्हाद मोदी यांनी सांगितले.

Share