गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

मुंबई : गोवर संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या. त्याचबरोबर दहा कलमी कार्यक्रम राबविण्‍यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे येथे टास्क फोर्सची पहिली बैठक झाली. यावेळी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष सोळंके यांनी सांगितलं की, गोवरचा उद्रेक थांबवण्यासाठी सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर लसीकरण केलं जाणार आहे. येत्या २६ जानेवारीपर्यंत संपूर्ण लसीकरण मोहीम संपवण्यात येईल. लसीकरणासोबत दहा कलमी कार्यक्रम आखण्यात आला आहे.

कसा असेल दहा कलमी कार्यक्रम?

ताप–पुरळ रुग्णाचे गतिमान सर्वेक्षण

राज्यातील गोवर हॉट स्पॉटचा शोध – उद्रेक स्थळे, लसीकरण कमी असणारे भाग, लोकसंख्येची दाटीवाटी असणारे, वंचित समाज समूह राहत असणारे आणि कुपोषण अधिक असणारे भाग या क्षेत्रावर विशेष भर दिला जाणार आहे.

विभागीय स्तरावर शीघ्र प्रतिसाद पथके आणि स्थानिक सूक्ष्म कृती आराखडा

९ महिने ते ५ वर्षेवयोगटातील बालकांसाठी विशेष लसीकरण अभियान आणि उद्रेक प्रतिसाद लसीकरण

कुपोषित बालकांकडे विशेष लक्ष – प्रत्येक कुपोषित बालकाला प्राधान्याने उपचारात्मक पोषण, जीवनसत्व अ आणि गोवर लसीकरण

आंतर विभागीय समन्वय – नगरविकास, महिला आणि बालविकास, अल्पसंख्याक कल्याण विभाग यांचेशी समन्वय.

राज्यातील सर्वांसाठी गोवर उपचार मार्गदर्शन सूचना

गोवर प्रयोगशाळा जाळ्यांचे अधिक विस्तारीकरण

गोवर रुग्ण आणि मृत्यूचे सखोल साथरोग शास्त्रीय विशेष सर्वेक्षण आणि त्यानुसार कृती योजना, दीर्घकालीन उपाययोजनेसाठी आवश्यक संशोधन आणि सर्वांगीण शहरी आरोग्य यंत्रणेसाठी योजना

सामाजिक प्रबोधन, लोकसहभाग आणी आरोग्य शिक्षण

Share