अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट

चेन्नईः अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट झाला आहे. १८ वर्षांच्या सुखी संसारानंतर ते विभक्त झाले आहेत. दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. ऐश्वर्या ही दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुषने अचानक पोस्ट करून ही घोषणा केल्याने त्याच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे. ऐश्वर्या आणि धनुष २००४ साली लग्नबंधनात अडकले होते. तसेच त्यांना दोन मुले आहेत.

 

धनुषने ट्विटरवर अत्यंत छोटी पोस्ट लिहून घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे. १८ वर्षाची सोबत. मैत्री, पती-पत्नी, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून आम्ही एक ग्रोथ, समजदारी आणि सहजीवनाचा प्रवास केला होता. आज आम्ही जीवनाच्या अशा टप्प्यावर उभे आहोत, जिथून आमचे मार्ग वेगवेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊन स्वत:चा शोध घेऊ. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या प्रायव्हसीची कदर करून आम्हाला त्याच्याशी डील करू द्या, अशी भावूक पोस्ट धनुषने लिहिली आहे.

धनुष हा प्रसिद्ध निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे. धनुष मल्टिटॅलेंटेड आहे. धनुष अभिनेता तर आहेच. शिवाय दिग्दर्शक, निर्माता, डान्सर, पार्श्वगायक, गीतकार आणि संवाद लेखकही आहे.ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी असून ती चित्रपट दिग्दर्शक आणि पार्श्वगायिका देखील आहे. या दोघांना यात्रा आणि लिंगा नावाची दोन मुले आहेत.

धनुष आणि ऐश्वर्याची लव्ह स्टोरी
Kadhal Kondaen या सिनेमाच्या दरम्यान धनुष आणि ऐश्वर्याची भेट झाली होती. सिनेमाच्या निर्मात्याने ऐश्वर्याची धनुष सोबत ओळख करून दिली. ऐश्वर्याने या सिनेमातील कामाबद्दल धनुषचं कौतुक केले होते. ऐश्वर्याने कामाचे कौतुक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनुषने ऐश्वर्याला फुलांचा गुच्छ पाठवला. ऐश्वर्याला धनुषची ही भेट प्रचंड आवडली आणि त्यानंतर दोघे चांगले मित्र बनले. दोघेही जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा तेव्हा ते फोटोग्राफर्सच्या नजरेतून सुटत नसायचे. त्यामुळे दोघांचे फोटो वारंवार छापून यायचे. मीडियात दोघेही बातमीचा विषय बनून गेले होते. मात्र, आपल्या नातेसंबंधावर धनुषने कधीच उघडपणे भाष्य केले नव्हते. ऐश्वर्या आपल्या बहिणीची मैत्रीण आहे असेच ते सांगायचे. मात्र, कालांतराने दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघांच्या लव्ह स्टोरीची अधिकृत माहिती समोर आली. १८ नोव्हेंबर २००४  रोजी दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला अख्खी साऊथची फिल्म इंडस्ट्री हजर होती.

Share