अभिनेत्री स्पृहा जोशीने आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवले वारीचे वातावरण

पुणे  : सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या आषाढी वारीची सर्वत्र चर्चा होत आहे. हजारो कष्टकरी आपल्या शेतीची कामे बाजूला ठेवून भक्तिभावाने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दिंडीत सहभागी होताना दिसत आहेत. अनेक मराठी कलाकारही पंढरपूरच्या वारीत सहभागी होत आहेत. नुकतेच अभिनेत्री स्पृहा जोशी ही वारीत सहभागी झाली. यावेळी वारीत आलेला अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनंतर यंदा पायी आषाढी वारी होत आहे. अनेक संतांचा पालखी सोहळा पायी पंढरपूरच्या दिशेने कूच करीत आहे. ‘विठूमाऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची…’ असा गजर पांडुरंगाच्या पंढरीत पुन्हा एकदा ऐकण्यास मिळत आहे. लाखो वारकरी आणि भाविक यांना पंढरीच्या आषाढी एकादशी सोहळ्याचे वेध लागले आहेत. त्याचबरोबर विठूरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.

मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील आघाडीची अभिनेत्री आणि संवेदनशील कवयित्री स्पृहा जोशी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नुकतेच स्पृहा पंढरपूरच्या वारीत सहभागी झाली होती. स्पृहा जोशीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत स्पृहाने पंढरीच्या वारीचा आणि पालखीचा अनुभव कथन केला आहे. तसेच वारीत सहभागी होणाऱ्या लोकांशी तिने गप्पाही मारल्या. त्यांचे अनुभव ऐकले. हा सगळा सुखद अनुभव स्पृहाने या व्हिडीओत सांगितला आहे.

https://www.instagram.com/tv/CfWFVr3MeSB/?utm_source=ig_web_copy_link

“आयुष्यात पहिल्यांदाच वारीचं, पालखीचं वातावरण अनुभवायची संधी मिळाली. पूर्ण वेळ मी आसपासचे हरीभक्तीत लीन झालेले चेहरे नुसते बघत राहिले होते. ओढ, समर्पण, असोशी, तळमळ.. सगळे कागदावरचे शब्द.. काल त्या शब्दांची माणसं होताना पाहिली.. पांडुरंग हरी, असे स्पृहा जोशीने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे. स्पृहाने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. तसेच तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. भक्तिमय अनुभूती…छानच, जय हरी विठ्ठल, अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.

सध्या स्पृहा जोशी ही ‘सूर नवा, ध्यास नवा’ या रिॲलिटी शोच्या नव्या पर्वात पुन्हा एकदा निवेदकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या कार्यक्रमासाठी ऑडिशन सुरू आहे. लवकरच ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे. ‘सूर नवा, ध्यास नवा’ या रिॲलिटी शोच्या नव्या पर्वातही गायक महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक म्हणून आपल्याला दिसणार आहेत.

Share