दारु पिऊन मैदानावर झोपला, बस डोक्यावरुन गेल्याने जागीच मृत्यु

औरंगाबाद : दारु पिऊन मैदानावर झोपणे एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे. शिवाजीनगरमधील सिडकोच्या मैदानावर दारू पिऊन झोपलेल्या युवकाच्या डोक्यावरुन रात्री ट्रान्सपोर्टची बस गेल्याने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि यात त्या युवकाचा जागीच मृत्यु झाला. ही घटना काल सकाळी उघडकीस आली. कैलास भीमराव ढिलपे (वय.२५) असे मृत युवकाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, शिवाजीनगरपासून जवळच असलेल्या इंदिरानगरमध्ये राहणारा कैलास फिटरचे काम करायचा. तो रविवारी सायंकाळी घरातून मित्रासोबत बाहेर गेला होता. मित्राने पुन्हा सायंकाळी ७ वाजता शिवाजीनगरात सोडले. त्यानंतर कैलासने आतेभावाला कॉल करून भेटण्यासाठी बोलावले. मात्र, आतेभाऊ न आल्याने कैलास मैदानावरच झोपला. याच मैदानावर नेहमी कंपनीच्या कामगारांच्या बस उभ्या असतात. त्यापैकी एका बसचा चालक कैलास रुस्तुम नागरे (वय.३४) याने ११ वाजता कामगारांना घेऊन जाण्यासाठी बस काढली. नागरेला मात्र त्याला झोपलेला कैलास दिसला नाही. नागरेने बस सुरू करून वळण घेत निघून गेला. मात्र, डोक्याचा चुराडा झालेल्या अवस्थेतच कैलासचा मृतदेह सोमवारी सकाळी समोर आला.

माहिती मिळताच सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक वसंत शेळके, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी घातपाताच्या संशयावरून घटनास्थळी धाव घेतली. तपासानंतर मात्र बसच्या खाली चिरडल्याचे समोर आले. मैदानावर झोपताना चोरीला जाऊ नये म्हणू कैलासने अंतर्वस्त्राच्या आत मोबाइल लपवला होता. ओळखपत्र सापडण्याचा प्रयत्न करताना पोलिसांना मोबाइल आढळून आला. याप्रकरणी चालक नागरेला जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Share