फडणवीसांच्या व्हिडिओ बाँबनंतर,महाविकास आघाडीच्या नेत्यांची सावध प्रतिक्रिया

मुंबई-  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्हिडिओ अटॅक करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिलीय. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील यांच्यावर फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय. सरकारकडून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय. विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडिओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. दरम्यान, फडणवीसांच्या या गंभीर आरोपांबाबत सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया दिली जातेय. तसंच फडणवीसांनी दिलेले सर्व व्हीडिओ तपासूनच त्यावर उद्या सविस्तर बोलेन असं उत्तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलीय.

व्हिडिओची सत्यता पडतळावी लागेल : वळसे पाटील

देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप करत एक पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे दिला. आपल्याकडे तब्बल सव्वाशे तासाचं फुटेज असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. फडणवीसांच्या या आरोपांबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले की अजून मी व्हिडीओ पाहिले नाहीत. उद्या मी यावर उत्तर देईन. व्हिडीओची सत्यता पडतळावी लागेल. जे आरोप झालेत त्यावर उद्या सविस्तर बोलेन, असं वळसे पाटील यांनी सांगितलं.

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनीही सावध प्रतिक्रिया देत फडणवीसांनी नेमके काय आरोप केले हे तपासले पाहिजे. सरकारची काम करण्याची पद्धत चुकीची नाही. नियमानुसार कारवाई केली जाईल. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याबाबत अधिक घोषणा करतील, असं देसाई म्हणाले.

यंत्रणांचा दुरुपयोग करायची सवय भाजपची : पटोले

नाना पटोले यांनीही फडणवीसांच्या आरोपांबाबत खोचक टीका केलीय. जे काही व्हिडिओज विधानसभा अध्यक्षांना दिलेत त्याची सत्यता तपासावी लागेल. आमचे मित्र नटसम्राट आहेत, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहिती आहे. त्यांनीही सत्तेचा दुरुपयोग करुन फोन टॅपिग केलं आहे. यंत्रणांचा दुरुपयोग करायची सवय भाजपची आहे. फडणवीस सरकारपासून ही प्रथा पडलीय, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच भाजपनं इक्बाल मिरचीकडून गोळा केलेल्या फंडिंगचंही उत्तर दिलं पाहिजे, असेही ते म्हणाले.

जे काही व्हिडिओज विधानसभा अध्यक्षांना दिलेत त्याची सत्यता तपासावी लागेल. आमचे मित्र नटसम्राट आहेत, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांच्या आरोपांची खिल्ली उडवली आहे. भाजपवर प्रत्यारोप करताना, फडणवीसांच्या आरोपांना उद्या गृहमंत्री याबाबत उत्तर देतील, या व्हिडिओची सत्यता तपासणे गरजेचे आहे. शरद पवारांसारख्या महत्वाच्या व्यक्तीवर आरोप आहे. त्यामुळे व्हिडिओची डबिंग झालेली असू शकते, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

Share