‘अग्निपथ’च्या विरोधात आंदोलन; सिकंदराबादमध्ये रेल्वे पेटवली, गोळीबारात एकाचा मृत्यू

सिकंदराबाद : केंद्र सरकारने सैन्य दलातील भरतीसाठी सुरू केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला विरोध करीत उत्तर भारतातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाचे लोण आता दक्षिण भारतात पोहोचले आहे. तेलंगाणा राज्यातील सिकंदराबादमध्ये आज शेकडो तरुणांनी एकत्र येत रेल्वेगाड्यांचे आणि स्टेशनवरील दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सिकंदराबादमध्ये आज सकाळी झालेल्या आंदोलनात १३ जण जखमी झाले, तर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्यभरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले असून आंदोलन केले जात आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जात आहे. आता दक्षिण भारतातही तरुण ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. सिकंदराबाद येथे युवकांनी आज शुक्रवारी सकाळी आक्रमक आंदोलन केले. रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेला पेटवून देण्याचा तरुणांनी प्रयत्न केला. युवकांच्या आक्रमक आंदोलनानंतर सिकंदराबादमधील रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे. आंदोलकांनी रेल्वे स्टेशनवरील कार्यालयांचेदेखील नुकसान केले आहे. ‘अग्निपथ’ योजनेला विरोध करताना सिकंदराबादमध्ये तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण मिळण्यासाठी पोलिसाकंडून १७ राऊंड फायर करण्यात आले. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण जखमी झाले आहेत. त्यातील दोन जण गंभीर जखमी आहेत.

सिकंदराबादमधील घटनेनंतर तेलंगाणामध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिकंदराबादमधील रेल्वेसेवा आणि टीएसआटीसीच्या सेवेवर या आंदोलनाचा परिणाम झाला आहे. सिकंदराबादमधील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं सीआरपीएफच्या तीन तुकड्या पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे अग्निपथ भरती योजना ?
भारतीय तिन्ही सैन्यदलांमध्ये १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना ‘अग्निवीर’ म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. चार वर्षांच्या कालावधीसाठी (प्रशिक्षण काळासह) तरुणांना समाविष्ट केले जाईल. महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतन (लागू असल्यास स्वतंत्र भत्ता) मिळणार आहे. वेतनात दरवर्षी काहीअंशी वाढ होईल. प्रत्येक अग्निवीरास मासिक वेतनातील ३० टक्के रक्कम अग्निवीर समूह निधीत द्यावी लागेल. यातून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधीअंतर्गत ११.७१ लाख रुपये मिळतील, जे करमुक्त असतील. भरतीत इच्छुकांना आवश्यक त्या वैद्यकीय पात्रता पूर्ण कराव्या लागतील.

तरुणांना ‘अग्निवीर’ म्हणून सेवेत घेण्यासाठी यापूर्वी जाहीर केलेली वयोमर्यादा तरुणांचा रोष पाहता केंद्र सरकारने आता २१ वरून २३ वर्षे केली आहे. पहिल्या वर्षी ४६ हजार युवकांची ‘अग्निवीर’ म्हणून भरती करण्यात येणार आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कामगिरीच्या आधारे त्यांना स्थायी सेवेत दाखल होता येईल. प्रत्येक तुकडीतील २५ टक्के अग्निवीरांना या पद्धतीने स्थायी सेवेत स्थान देण्यात येणार आहे.

तरुणांचा संताप आणि आंदोलन
लष्करात भरती होऊ इच्छिणारे तरुण ‘अग्निपथ’ योजनेविरोधात संताप व्यक्त करत आहेत. आंदोलनकर्त्यांमधील अनेकजण गेल्या दोन वर्षांपासून संरक्षण दलात नोकरी मिळण्यासाठी वाट पाहणारे आहेत. अनेक निवृत्त जवानांनीदेखील या योजनेला विरोध केला आहे. आंदोलन करणारे तरुण चार वर्षांच्या सेवेनंतर काय? असा प्रश्न विचारत आहेत. लष्करात भरती होण्याची इच्छा असणारे हे तरुण यामुळे ना आम्हाला, ना देशाला फायदा होणार असल्याचे सांगत आहेत. ‘अग्निपथ’ योजनेत चार वर्षांनी फक्त २५ टक्के तरुणांना संधी मिळणार आहे आणि त्यामुळेच तरुणांचा अग्निपथ योजनेला जास्त विरोध होत असल्याचे सांगितले जात आहे.

Share