राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या भावाच्या घरावर सीबीआयचा छापा

जोधपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कॉँग्रेस नेते अशोक गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या  घरावर तसेच खताच्या दुकानावर आज सीबीआयने छापा टाकला आहे. यापूर्वी ईडीने अग्रसेन गेहलोत यांच्या घरावर छापा टाकला होता. पोटॅश घोटाळाप्रकरणी सीबीआयने आज अग्रसेन गेहलोत यांच्या जोधपूर येथील घरावर तसेच पावटा येथील खताच्या दुकानावर छापेमारी केल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्रसेन गहलोत यांनी २००७ ते २००९ दरम्यान खते बनवण्यासाठी लागणारे पोटॅश शेतकर्‍यांना वाटण्याच्या नावाखाली सरकारकडून अनुदानावर विकत घेतले. मात्र, नंतर ते उत्पादन शेतकर्‍यांना न देता खासगी कंपन्यांना विकून नफा कमावला, असा अग्रसेन गहलोत यांच्यावर आरोप आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रसेन गहलोत यांची कंपनी अनुपम कृषी म्युरिएट ऑफ पोटॅश (एमओपी) वर खताच्या निर्यात करण्याबाबत बंदी घातली होती. मात्र, त्यानंतरदेखील ही कंपनी खत निर्यात करत होती. अग्रसेन गहलोत हे आयपीएलचे अधिकृत डीलर होते. २००७ ते २००९ दरम्यान त्यांच्या कंपनीने सवलतीच्या दराने एमओपी खरेदी केले; परंतु ते शेतकर्‍यांना विकण्याऐवजी त्यांनी इतर कंपन्यांना विकले. त्या कंपन्यांनी औद्योगिक मिठाच्या नावाखाली एमओपी मलेशिया आणि सिंगापूरला नेले होते.

या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडूनही सुरू आहे. सीमाशुल्क विभागाने अग्रसेन गहलोत यांच्या कंपनीला सुमारे ५.४६ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता. अग्रसेन यांच्या अपिलावर उच्च न्यायालयाने ईडीशी संबंधित प्रकरणात त्यांच्या अटकेला स्थगिती दिली होती. आता सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सीबीआयचे पथक आज शुक्रवारी (१७ जून) सकाळी अचानक अग्रसेन गहलोत यांच्या घरी पोहोचले. अग्रसेन गहलोत त्यावेळी घरीच होते. सीबीआयच्या पथकात दिल्लीतील पाच आणि जोधपूरमधील पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पावटा येथील अग्रसेन गहलोत यांच्या खताच्या दुकानाचीही सीबीआयच्या एका पथकाने झाडझडती घेतल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. राहुल गांधी यांची ही चौकशी राजकीय सूडबुद्धीतून सुरू असल्याचा आरोप करीत कॉँग्रेसकडून देशभर आंदोलन केले जात आहे. अग्रसेन गहलोत यांच्यावर आज सीबीआयने केलेल्या या कारवाईचा संबंध अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांच्यासाठी दिल्लीत केलेल्या निषेध आंदोलनाशी जोडला जात आहे.

Share