कृषीमंत्री आसाममध्ये महाराष्ट्रातील शेतकरी मात्र वाऱ्यावर – संजय राऊत

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ३७ पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आणखीही काही आमदार शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचं समोर येत आहेत. अशात काल राज्याचे कृषीमंंत्री दादा भूसे, माजी मंत्री संजय राठोड, शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी टोला लगावलाय.

शिवसेना खा. संजय राऊत यांनी ट्वीट मध्ये म्हटलं की, खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत. मात्र राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री कृपया आपण लक्ष द्या. अशा शब्दात संजय राऊतांनी  ट्विट करत दादा भुसेंना टोला लगावलाय.

 

दरम्यान, दादा भुसे आणि एकनाथ शिंदे यांचे फार पूर्वीपासून एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत. तरुण काळात ठाणे जिल्ह्यात पाटबंधारे खात्याच्या नोकरी करत असताना भुसे यांचा संपर्क आनंद दिघे यांच्याशी झाला होता. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन भुसे हे समाजकारण आणि राजकारण करीत असताना त्यांची आणि एकनाथ शिंदेची मैत्री घट्ट झाली होती. शिवाय धर्मवीर आनंद दिघे मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात देखील या दोघांच्या मैत्रीचे किस्से दाखविण्यात आले आहेत.

Share