मुंबई : बाहुबली, आरआरआर यासारखे बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी करून दाखवणारे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या आगामी चित्रपटामध्ये विश्वसुंदरी आणि बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या रॉय-बच्चन ही काम करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या चित्रपटात ऐश्वर्या रॉय-बच्चन ही दुहेरी भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आजच्या घडीला भारतातील सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून एस.एस. राजामौली यांच्याकडे पाहिले जाते. टॉलिवूडमधील ते एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी आजवर बाहुबली, आरआरआर यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दिग्दर्शक राजामौली यांचा यावर्षी ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला आहे. या चित्रपटाने यावर्षी मे महिनाअखेर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून वेगळी प्रसिद्धी मिळवली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रॉय-बच्चन ही आता एस. एस. राजामौली यांच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करणार असल्याची बातमी व्हायरल होताच नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
ऐश्वर्या रॉय-बच्चन ही लवकरच ‘पोन्नियिन सेलवन’ या चित्रपटाममध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. बऱ्याच काळानंतर ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पोन्नियन सेलवन’मध्ये ती डबल रोल साकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी त्या चित्रपटातील ऐश्वर्याचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याला तिच्या चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती. एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्याने म्हटले होते की, मला जेव्हा मणिरत्नम यांच्या त्या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा मी घाबरून गेले होते. त्यांच्या चित्रपटात काम करायचे म्हणजे मोठे धाडस असावे लागते. अतिशय मेहनती दिग्दर्शक म्हणून मणिरत्नम यांचे नाव घ्यावे लागेल, असे ऐश्वर्याने सांगितले होते. या चित्रपटानंतर ऐश्वर्या ही रजनीकांत यांच्या ‘१६९’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
https://www.instagram.com/p/CdvR2VmIQrp/?utm_source=ig_web_copy_link
मला पुन्हा अभिषेकसोबत काम करायचे आहे. त्याच्यासोबत आणखी एक चित्रपट करण्याची इच्छा आहे. मला माहिती आहे की, आज नाही तर उद्या पुन्हा त्याच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळेल, असा विश्वास ऐश्वर्याने व्यक्त केला आहे. दुसरीकडे अभिषेक बच्चननेदेखील ऐश्वर्याची मागणी लवकरच पूर्ण होईल, असे म्हटले आहे. आम्ही एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असल्याचे त्याने सांगितले.