राज्यात यंदा सर्वच सण धुमधडाक्यात साजरे होणार

मुंबई : गणेशोत्सव, दहीहंडी  आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण – उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावेत यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व एक खिडकी योजनेंतर्गत देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यानी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात तसेच विविध व्यवस्थेबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे म्हणाले की, गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या सावटाखाली होतो, त्यामुळे आपले सण उत्साहाने साजरे करता आलेले नाहीत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, दही हंडी हे सण उत्साहाने, जल्लोषात साजरे व्हावेत यासाठी राज्य शासनामार्फत गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करण्यात येईल. सर्वं मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच समाज प्रबोधन, सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम या सणाच्या काळात राज्यामधील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील या दृष्टीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही तातडीने करावी. याबरोबरच कोकणात जाण्यासाठी पुरेशा प्रमाणात एस. टी. बसेस उपलब्ध करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या.

पुढील सण निर्बंध मुक्त होणार 

राज्यातील सण निर्बंधमुक्त करण्यात येत असून राज्यात गणेशात्सव, दहीअंडी आणि मोहरम हे सण निर्बंधमुक्त असणार आहेत. कोविडच्या काळात सण समारंभ साजरे करता आले नसल्याने यावेळी शिंदे-फडणवीस सरकारने हे कोरोना काळातील नियम हटवून पुढील सण निर्बंधमुक्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी गणेश चतुर्थीसाठी एसटी प्रशासनाला जादा बस सोडण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत.

कायदा सुव्यवस्था राखा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले की, कायदा सुव्यवस्था राखून सण उत्सव साजरे करा. अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आगमन आणि विसर्जन मार्गावरच्या रस्त्यावरच्या खड्डे दुरुस्त करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत.

एक खिडकी योजना

गणेशोत्सवासाठी घालण्यात येणारे मंडपवाल्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मंडवाल्यांना परवानगीसाठी सतत खेटे घालावे लागू नयेत त्यासाठी एक खिडकी योजना चालू करण्याची सुचनाही देण्यात आली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, क्लिष्ट अटी व शर्ती असू नयेत यासाठी एक खिडकी योजनेचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या बैठकीत मंडळाना नोंदणी शुल्क भरावे लागू नये यासाठी सवलत आणि सूट देण्यात आली आहे. उत्सावासाठी हमी पत्र घेण्याचीही गरज नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबईतील नियमवली राज्यभरात लागू

गणेशोत्सवासाठी सामाजिक बांधिलकी, आणि नियमांचे पालन केले पाहिजे असे सांगत त्यांनी सांगितले की, मुंबईतील नियमवली राज्यभरात लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या गणेशोत्सवामध्ये मूर्तीवरील उंचीची मर्यादा घालवण्यात आली आहे. हो उत्सव साजरा होत असताना अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी तसेच गणेशोत्सवाच्या विसर्जन घाटावर प्रकाशदिव्यांची व्यवस्था करा असेही त्यांनी सांगितले.

Share