जीव गेला तरी बेहत्तर, मोदी सरकारची दडपशाही सहन करणार नाही – यथोमती ठाकूर

अमरावती : केंद्रातील मोदी सरकराची दडपशाही सहन करणार नाही, प्रसंगी आमचा जीव गेला तरी बेहत्तर.. सोनिया गांधीना कुणी हात लावला, तर आम्ही त्यांना माफ करणार नाही, अशे सांगत काॅंग्रेस नेत्या यथोमती ठाकूर यांनी मोदी सरकारच्या दपडशाही विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. अमरावतीत यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्‍त कार्यालयावर निषेध मोर्चा काढून इर्विन चौकात आंदोलन करण्यात आले. त्‍यावेळी यशोमती ठाकूर यांनी माध्‍यमांशी संवाद साधला.

केंद्रातील मोदी सरकारने कित्येक राज्यांमध्ये ‘इडी’चा आधार घेत ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केले आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसताना, त्या रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना चौकशीला बोलावले जात आहे, हे दुर्दैवी आहे. सोनिया गांधी यांची ‘इडी’मार्फतची चौकशी ही राजकीय द्वेषातून केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या मोदी सरकारच्या कळसूत्री बाहुल्या झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर त्या केवळ सरकार विरोधात आवाज उठविणाऱ्या, तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत आहेत. पण ही दडपशाही आम्ही सहन करणार नाही, असे त्या म्हणाल्या.

काँग्रेसच्या कार्यकर्त्‍यांनी इर्विन चौकात केंद्र सरकारच्‍या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. तसेच ‘खूप झाली दडपशाही, देशात हवी लोकशाही’, ‘बंद करा बंद करा, तपास यंत्रणांचा गैरवापर बंद करा’ अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलन केले.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील देशमुख, जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख, प्रवक्ते दिलीप एडतकर, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, आमदार अमित झनक, आमदार बळवंत वानखेडे, आमदार वजाहत मिर्झा, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शहर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, किशोर बोरकर आदी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Share