शिक्षणाबरोबर खेळाच्या विकासावर लक्ष द्यावे- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे :  राज्यशासन खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे.  विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडाकौशल्य विकसित करण्यावर लक्ष द्यावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. रामचंद्र अभियांत्रिकी व पदविका महाविद्यालय लोणीकंद येथे तंत्र शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटनाअंतर्गत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत ७ हजार विद्यार्थी आणि २ हजार ५०० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला असून विभागस्तरावरुन ३२२ विद्यार्थी आणि २३० विद्यार्थीनी या ठिकाणी सहभागी झाले आहे.  जास्तीत जास्त क्रीडा उपक्रम घेण्याचा सूचना संचालनालयाला देण्यात आल्या आहेत.  पुढच्या वर्षी होणाऱ्या स्पर्धेत  खेळाडूंचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

राज्य शासनाने राज्यस्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग तीन च्या पदावर, राष्ट्रीयस्तरावर पदक प्राप्त खेळाडूला वर्ग दोन च्या तर आंतरराष्ट्रीयस्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग एक च्या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण न करता नियुक्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे.  पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना वेगवेगळ्या खात्यात उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार अशा विविध पदावर नियुक्ती देण्यात आल्या आहे, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

Share