यूक्रेनचे राजदूत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद

नवी दिल्ली : सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून रशिया या देशाने युद्ध घोषित केले आहे. युद्धाची घोषणा करत यूक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये हल्ले करण्यास सुरुवात केलीय. रशियानं हल्ला केल्यानंतर यूक्रेनमधील लोक देश सोडून पळू लागले आहेत. रशियाच्या बरोबर बेलारुसनं देखील यूक्रेनवर हल्ला केला आहे. यूक्रेनचं सैन्य दल देखील रशियाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांनी आता जागितक नेत्यांकडे मदतीची विनंती केली आहे.

यूक्रेनच्या राजदूतांनी भारताला साद घातली आहे. यूक्रेनच्या राजदूतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. भारत सद्यस्थितीत एक पावरफुल ग्लोबल प्लेयर बनला आहे आणि भारताने या मुद्द्यावरुन रशियाच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली पाहिजे. भारत आणि रशियाचे संबंध चांगले आहेत. अशावेळी आम्हाला खात्री आहे की भारताच्या पंतप्रधानांचे म्हणणे रशियाचे राष्ट्रपती नक्की ऐकतील’, असे यूक्रेनच्या राजदूतांनी म्हटले आहे.

भारतातील यूक्रेनचे राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी रशिया आणि यूक्रेन दरम्यान सुरु असलेल्या संघर्षात भारताने हस्तक्षेक करावा अशी मागणी केली आहे. यूक्रेनच्या राजदूतांनी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करावी असा आग्रह धरलाय.

पोलिखा म्हणाले की, सध्या यूक्रेनची अवस्था पाहता भारताने या प्रकरणात हस्तक्षेप केला पाहिजे. भारत आता एक पॉवरफूल ग्लोबल प्लेयर आहे. त्यामुळे भारताने अन्य मोठ्या देशांप्रमाणे या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या जगातील सर्वात ताकदवान नेत्यांपैकी एक आहेत. जगातील सर्वच देशांचे नेते त्यांचा पूर्ण सन्मान करतात. भारत आणि रशियाचेही मैत्रिपूर्ण संबंध आहेत. तसेच या प्रकरणात देशातील किती देश रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करत आहेत, हे मला माहिती नाही. मात्र, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या राष्ट्रपतींना आता थांबण्यास सांगावे.

Share