हर हर महादेव चित्रपटावर अमोल मिटकरींचा आक्षेप

मुंबई : ‘हर हर महादेव’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी ट्विट करत या चित्रपटावर आक्षेप नोंदवला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘हर हर महादेव’ चित्रपट सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. अशातच या सिनेमातील संवादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी आक्षेप घेतला आहे. मिटकरींनी ट्वीट करत आपला आक्षेप नोंदवला आहे.

अमोल मिटकरी यांनी हर हर महादेव सिनेमावर आक्षेप घेत ट्वीट करत म्हटलं की, ‘व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा अतिवापर हर हर महादेव सिनेमात जाणवला. सुबोध भावे यांनी साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका (अभिनय छान असला तरीही ) रसिक मनाला पटणारी नाही. चित्रपटातील संवाद शिवकालीन वाटत नाहीत. राज ठाकरे यांचं निवेदन सिनेमात सर्वात प्रभावी वाटतं.’

 

अमोल यांनी अजून एक ट्वीट करत म्हटलं की, ‘अफजल खानाचा कोथळा काढताना खानाने महाराजांच्या डोक्यावर वार केल्यानंतर दाखवलेला रक्तस्त्राव असो किंवा सईराणी साहेब व महाराजांना जिजाऊ साहेबांनी एकेरी भाषा वापरल्याचे मी तरी वाचले नाही. बाजीप्रभु यांची शब्दफेक आणि जेधे बांदल यांच्यातील दाखवलेले वैर इतिहासाला धरून नाही.’

 

दरम्यान, संपूर्ण भारतात एकूण ४०० चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. ४०० चित्रपटगृहात चित्रपटाचे एकूण १ हजार २०० शो दाखवण्यात आले आहेत. त्यात पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून २ कोटींची कमाई करण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी चित्रपटाने १ कोटी ३७ लाखांची कमाई केली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ८० लाखांची कमाई केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे बॉलिवूड सिनेमांना मागे टाकत ‘हर हर महादेव’ यशस्वी घौडदौड करताना दिसतोय.

Share