अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर; ३ नोव्हेंबरला मतदान

मुंबई : शिवसेना आमदार रमेश लाटके यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ३ नोव्हेंबर रोजी होणार मतदान पार पडणार आहे तर ६ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने आले आहे. पण अजूनही शिंदे गटाला पक्षाचे चिन्ह न मिळाल्यामुळे सस्पेन्स निर्माण झाला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. १४ ऑक्टोबरही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. १५ ऑक्टोबर रोजी अर्ज छाननी होणार आहे. तर १७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतूजा लटके यांना उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र, त्यांच्या विरोधात कोण लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही पोटनिवडणूक शिंदे गट लढणार की भाजप लढणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने रमेश लटके यांचं निधन
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके बुधवारी ११ मे २०२२ संध्याकाळी दुबईत हृदयविकाराने निधन झालं. ते दुबईला आपल्या कुटुंबासह फिरायला गेले होते. परंतु तिथेच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २१ एप्रिल रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. ते मूळचे ​कोल्हापुरातील शाहूवाडीचे होते. ५२ वर्षात त्यांचा राजकीय प्रवास मात्र भन्नाट होता. शिवसेनेचा अंधेरी भागातला एक विश्वासू चेहरा अशी त्यांची ओळख होती.

Share