“…तर त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहायचं नाही”; शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर लॉन्च

मुंबई : शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. शिवाजी पार्कात तब्बल दोन वर्षांनी दसरा मेळावा होणार आहे. तसंच, यंदा राजकीय उलथापालथ झाल्याने यावर्षीच्या शिवाजी पार्कावरील दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा दुसरा टिझर रिलीज करण्यात आला आहे.

“छत्रपतींनी आपल्याला शिकवलं कोणाच्या पाठीत वार करायचा नाही आणि जर कोणी पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही” असं म्हणत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. शिवसेनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

“एक नेता, एक झेंडा, एक मैदान… एकनिष्ठ शिवसैनिकांचा.. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा! स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर ५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा” असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेने याआधी देखील टीझर लाँच केला आहे. ठाकरे गटाने निष्ठेचा महासागर उसळणार असे म्हणत शिवसैनिकांना मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Share