अंकिता लोखंडे-विकी जैनने पटकावले ‘स्मार्ट जोडी’चे विजेतेपद

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांनी ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘स्मार्ट जोडी’ या कार्यक्रमात स्मार्ट जोडीचे विजेतेपद पटकावले आहे. नुकतेच या शोच्या विजेत्या जोडीची घोषणा करण्यात आली. त्यात अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे दोघे विजेते ठरले आहेत. त्यांना २५ लाख रुपये आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. ‘स्मार्ट जोडी’ शोची विजेता म्हणून घोषित झाल्यानंतर अंकिता भावूक झाल्याचे पाहावयास मिळाले.

अंकिता लोखंडे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ ही तिची मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. या मालिकेतील दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे या दोघांची जोडी चांगलीच हिट झाली होती. खऱ्या आयुष्यातही (रीयल लाईफ कपल) सुशांत आणि अंकिताची जोडी सोशल मीडियात हिट होती. मात्र, काही कारणाने या दोघांचे बिनसले आणि ते वेगळे झाले. सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर अंकिता लोखंडे तिचा प्रियकर विकी जैन याच्यासोबत काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकली आहे. मुंबईत राजेशाही थाटात अंकिता-विकीचा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर काही महिन्यांनी ते दोघेही ‘स्टार प्लस’वरील ‘स्मार्ट जोडी’ या कार्यक्रमात झळकले होते.

https://www.instagram.com/tv/CecfPgUBh-T/?utm_source=ig_web_copy_link

‘स्मार्ट जोडी’ हा शो मार्चमध्ये सुरू झाला होता. लग्न झाल्यानंतर अंकिता लोखंडे आणि विकी जैन या जोडीने लगेचच या शोमध्ये भाग घेतला होता. त्यांच्याशिवाय अर्जुन बिजलानी-नेहा स्वामी, भाग्यश्री पटवर्धन -हिमालय दासानी, नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा, नताल्या इलिना-राहुल महाजन, पल्लवी शुक्ला-अंकित तिवारी या जोड्यांचाही या कार्यक्रमात समावेश होता. नुकतेच या शोच्या विजेत्या जोडीची घोषणा करण्यात आली. त्यात अंकिता लोखंडे आणि विकी जैन या जोडीने ‘स्मार्ट जोडी’ म्हणून विजेतेपद पटकावले आहे.

https://www.instagram.com/tv/CedC3YflBwV/?utm_source=ig_web_copy_link

नुकतेच अंकिता लोखंडे हिने तिच्या इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख हे दोघेही त्यांना ट्रॉफी देताना दिसत आहेत. ‘स्मार्ट जोडी’चे विजेतेपद पटकावल्यानंतर अंकिता या व्हिडीओत फार आनंदात असल्याचे दिसत आहे. “विक्की, बघ आपण किती दूर आलो आहोत, आपल्याला याची किंमत नक्कीच आहे. आपल्यासाठी हे क्षण फार मोलाचे आहेत”, असे कॅप्शन या व्हिडीओला अंकिताने दिले आहे.

अंकिता एका मुलाखतीत म्हणाली, “माझा पती विकी हा चांगला अभिनेता किंवा माझ्यासारखा उत्तम डान्सर नाही; पण तरीही त्याने मला फार छान साथ दिली आहे. तो या कार्यक्रमात फार छान वागायचा. त्यावेळी विकीनेही माझ्याप्रमाणेच स्पर्धात्मक वृत्ती दाखवली. तो माझ्यापेक्षा चांगलं खेळला. विकी हा कॅमेऱ्यासमोर लाजतो, असे मला पूर्वी वाटायचे; पण तो एक उत्तम मनोरंजन करणारा आहे. आम्ही नेहमी एकत्र चांगले असतो आणि त्यासोबतच आम्ही आमच्या गोष्टी एकमेकांना सांगत असतो. विकीमुळे मी एक वेगळी व्यक्ती बनली आहे. त्याला त्याच्या आयुष्याचा उत्तम समतोल राखता येतो. विकीने माझ्यासाठी जे काही केले, त्यासाठी मला त्याचे आभार मानायचे आहेत”, असेही अंकिता म्हणाली.

झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या सीरियल कपलपासून ते रीयल लाईफ कपलपर्यंत सुशांतसिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची जोडी सोशल मीडियात हिट होती. मात्र, काही कारणाने २०१८ मध्ये सुशांत आणि अंकिता वेगळे झाले. २०२० मधे सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर अंकिताला सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. एका मुलाखतीत बोलताना अंकिता म्हणाली, “सुशांतच्या निधनानंतर मला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले गेले. सुशांतसाठी अंकिताच बेस्ट होती, तिने सुशांतबरोबरच राहायला हवे होते, असे लोक त्यावेळी म्हणत असत, तर अनेकांनी विकीवर टीका केली.अंकिताला सोडून जाण्याचे सल्ले दिले.

अंकिता म्हणते, “आपल्या एक्स बॉयफ्रेंडविषयी टेलिव्हिजनवर व्यक्त होणे कोणालाच आवडले नसते; परंतु त्यावेळी सुशांतविषयी दररोज नवी माहिती पुढे यायची आणि सतत त्याच्याविषयी बोलले जायचे. विकीच्या जागी दुसरा कोणी पुरुष असता तर त्याने मला कधीच सोडले असते; पण त्याने माझी खूप साथ दिली. सुशांतसाठी जे चांगले आहे ते तू कर, असे त्यावेळी तो म्हणाला होता.”

Share