सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माणिकराव जाधव यांच्या नावाची अण्णांकडून शिफारस

लातूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं अर्ज दाखल केला आहे. आपलं वाढतं वय आणि ढासळती तब्येत पाहता या खटल्यात आपल्यासह पाठपुरावा करण्यासाठी आणखीन एका व्यक्तीला याचिकाकर्ता म्हणून सहभागी करून घ्यावं, अशी विनंती करत निलंगाचे माजी आमदार माणिकराव जाधव यांच्या नावाची शिफारस अण्णा हजारे यांनी याचिकेतून केली आहे.

माजी आमदार माणिकराव जाधव यांचा सहकार क्षेत्राशी अनेक वर्षांचा संबंध असून साल १९७५ ते २००५ या तीन दशकात ते महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे अध्यक्षही होते. आजही वयाच्या ६८ व्या वर्षी जाधव हे सहकारी साखर कारखान्यांच्या विविध २६ कामगार संघटनांचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, काल सोमवारी वेळे अभावी यावर सुनावणी होऊ न शकल्यामुळे न्यायालयानं या याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.

Share