गुलाम नबी आझाद यांच्याकडून नावासह नव्या पक्षाची घोषणा

नवी दिल्ली : काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ असं गुलाब नबी आझाद यांच्या नव्या पक्षाचं नाव असेलं. जम्मूमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नव्या पक्षासह नावाची घोषणा केली आहे.

गुलाब नबी आझाद म्हणाले की, पक्षाची विचारधारा नावासारखी असेल आणि सर्व धर्मनिरपेक्षा लोक त्यात सामील होतील. आझाद यांनी यापूर्वीच पक्षाचा अजेंडा स्पष्ट केला असून, यामध्ये जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे, स्थानिक लोकांसाठी जमीन आणि नोकऱ्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवणे आदी मुद्द्यांचा समावेस आहे. मार्च २०२२ मध्ये गुलाम नबी आझाद यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

आपल्याकडे जनतेला देण्यासारखे खूप काही आहे आणि ज्यांच्याकडे जनतेला देण्यासारखे काही नाही ते शिव्या देतात. आमच्या पक्षाची विचारधारा ही गांधींची विचारधारा आहे. आमची धोरणे जात आणि धर्मावर चालणार नसल्याचेही आझाद म्हणाले. राजकारणात आपल्याला सर्व धर्मांबद्दल आदर असून, आम्ही सर्व पक्षांचा आदर करतो. आमचे कोणाशीही राजकीय वैर नसल्याचे आझाद यांनी यावेळी स्पष्ट केले.

Share