निलंगेकर साखर कारखान्याच्या विभागीय गट कार्यालयांचे उदघाटन

लातूर : निलंगा तालुक्यातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना (लिज) ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट – २, या कारखान्याच्या विभागीय गट कार्यालयांचे निटूर व निलंगा येथे घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

गतवर्षी मोठया प्रमाणात झालेली ऊसउत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता आणि शेतकरी बंधूंच्या आपल्या हक्काच्या कारखान्याची मागणी लक्षात घेता, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी पुढाकार घेऊन ओंकार साखर कारखान्याच्या माध्यमातून हा कारखाना सुरु करण्यात येत आहे.

या कारखान्याला कोणताही राजकीय स्पर्श होऊ देणार नाही, अशी ग्वाही देऊन कारखान्यासाठी शेतकरी हाच पक्ष असून त्यांचे हित हेच उद्दीष्ट राहणार आहे. कारखाना सुरु करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राज्य शिखर बॅंकेने जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार ही यावेळी व्यक्त केले. कारखान्याचे रोलर पूजन विजयादशमीच्या दिवशी करण्यात येणार असून संपूर्ण क्षेत्रातील ऊसाचे गाळप करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, कारखान्याचे कार्यकारी संचालक उमाकांत कोरे, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन दगडु सोळुंके, निलंगा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, शहराध्यक्ष वीरभद्र स्वामी, डॉ. लालासाहेब देशमुख, नरसिंग बिरादार, अंबादास जाधव, ॲड. संभाजीराव पाटील, गुंडेराव जाधव, गुंडेराव पाटील, सरपंच कडाजी जाधव, विजयकुमार जाधव, प्रकाश कोरे आदींसह परिसरातील शेतकरी बांधव बहुसंख्यने उपस्थित होते.

Share