राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार?

मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा, असा सूचक इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे.

मोहित कंबोज यांचं पहिलं ट्विट
हे ट्विट सेव्ह करुन ठेवा, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठ्यात मोठा नेता लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर संबंधित नेत्याविषयी तपास यंत्रणांकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं.

कंबोज यांचं दुसरं ट्विट
मोहित कंबोज यांनी ते लवकरच पत्रकार परिषद घेणार असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचं म्हटलं. त्यामध्ये संबंधित नेत्याची भारतातील आणि परदेशातील संपत्ती, बेनामी कंपन्या, त्या नेत्याच्या मैत्रिणीच्या नावावर असलेली संपत्ती, विविध खात्यामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना भ्रष्टाचार, त्या नेत्याच्या कुटुंबाचं उत्पन्न आणि संपत्तीची यादी पत्रकार परिषदेतून जाहीर करणार असल्याचं कंबोज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मोहित कंबोज यांच्या ट्वीटच्या मालिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता नेमका कोण? सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी होणार का? तसंच कोणत्या नेत्याचा ते पर्दाफाश करणार आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मोहित कंबोज यांच्या पत्रकार परिषदेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Share