अनुराग ठाकूरजी आमची केडीएमसी फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे – आ. राजू पाटील

कल्याण : कल्याण डोंबिवली शहर हे स्मार्ट सिटीमध्ये आहे का ? हे ऐकून मी आश्चर्य चकीतच झालो, इथे रस्ते पण खराब आहेत.’ अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि पालिका अधिकारी यांचा खरपूस समाचार घेतला आहे. यावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत आमची केडीएमसी फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे,अशी शब्दात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.

भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे तीन दिवसीय कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. कल्याण डोंबिवलीतील विकास काम पहाता त्यांनी सोमवारी पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मंत्री ठाकूर यांनी कल्याण डोंबिवली शहर हे स्मार्ट सिटी आहे हे ऐकूनच मी हैराण झालो. ज्या शहराला स्मार्ट सिटी म्हणून घोषित केले आहे त्या ठिकाणी बदल आणि काम झालेले मी पाहिले आहे. मात्र कल्याण डोंबिवली हे शहर स्मार्ट सिटी म्हणून घोषित केल्याचे मला वाटलेच नाही असे बोल महापालिका आयुक्त दांगडे आणि आधिकाऱ्यांना सुनावले.

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत गेले अनेक वर्षे शिवसेना-भाजप युतीची सत्ता राहिली आहे. खासदार, आमदार आणि नगरसेवक सुद्धा शिवसेना-भाजपचे राहिले आहेत. इतके वर्षे त्यांचे अंकुश अधिकाऱ्यांवर नव्हते का?, विकास कामांकडे त्यांचे लक्ष नव्हते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत आणि ठाकूर यांना टॅग करत ,’आमची केडीएमसी फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे. मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्कार असो. बरं झाले आपणच घरचा आहेर दिला, अशा शब्दात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापालिकेवर टीका केली आहे.

Share