शिवसेना नेतेपदी अरविंद सावंत, भास्कर जाधवांची नियुक्ती

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर पक्षातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त झाली आहे.या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून आता राज्यभरात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच तीन महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना प्रमोशन मिळाले आहे. तर शिवसेनेचे बुजुर्ग नेते लीलाधर डाके यांच्या मुलावर उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस निघालेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. या नेत्यांना आपल्या बाजुला वळवून आपलाच गट खरी शिवसेना असल्याचे शिंदेंकडून दाखवले जात आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे आता निष्ठावंतांची विशेष काळजी घेत असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे पराग लीलाधर डाके यांची शिवसेनेच्या सचिवपदी वर्णी लागल्याची चर्चा आहे.

Share