औरंगाबाद : पावसाळा सुरु होताच गल्लीतील पाणी थेट घरात येत असल्याने त्रस्त झालेल्या एका कुटुंबाने चक्क जॅक लावून घरच चार फुट उंच उचलले आहे. शहरातील सातारा परिसरातील एका घरमालकाने हाऊस लिफ्टिंगचा हा अनोखा प्रयोग करत घराची उंची वाढवली आहे. अशा प्रकारे जमिनीपासून संपूर्ण घर वर उचलण्याची ही औरंगाबादेतील किंबहुना मराठवाड्यातील पहिलीच घटना असल्याच बोलले जात आहे.
शहरातील सातारा भागात राहणारे आनंद कुलकर्णी हे एका खासगी कंपनीत कामाला आहेत. कुलकर्णी यांनी २०११ मध्ये सत्कर्मनगरात दोन हजार चौरस फूट जागेवर आपल्या स्वप्नातील घर बांधले. कालांतराने आजूबाजूला आणखी घरे बांधली गेली. त्यामुळे काही वर्षांनी गल्लीतून जाणारा रस्ता उंच झाला. घर खाली झाल्याने दरवर्षी घरामध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात शिरु लागलं. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी अनेक मार्गांचा विचार केला. घर पाडून बांधण्याचा खर्च अधिक असल्याने त्यांनी हाऊस लिफ्टींगचा पर्याय निवडला. यु-ट्यूबवरून त्यांना हरियाणात काहीजण घर जॅकच्या साह्याने उचलून देत असल्याचे समजले. त्यामुळे कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संपर्क केला. त्यांनतर ५ मे रोजी प्रत्यक्षात घर जॅकच्या साह्याने उचलण्याचे काम सुरु झाले.
घर पाडून बांधण्यापेक्षा वर उचलणे कमी खर्चिक
घराची उंची कमी झाल्यानंतर त्याला पाडून नवीन बांधणे खूप खर्चीक असते. तसेच नवीन घर बांधायचे तर प्रतीचौरस फुटाचा खर्च दीड हजाराच्या वर आहे. तर दुसरीकडे हाऊस लिफ्टिंगच्या सहाय्याने घर उचलल्यास प्रतीचौरस फुटाचा खर्च सरासरी २३० रुपये इतका आहे. त्यामुळे नवीन घर बांधण्यापेक्षा आहे त्या स्थितीत घर उचलण्यासाठी कमी खर्च लागतो.
अशी असते घर वर उचलण्याची प्रक्रिया…
सर्वप्रथम बंगल्यातील फ्लोरिंग उखडण्यात येते. बंगल्याचा पाया २ फूट खोल खोदण्यात येतो. त्यातील संपूर्ण माती बाहेर काढून टाकण्यात येते. त्यानंतर फाऊंडेशनचा सिमेंटचा भाग कापण्यात येतो आणि मोकळ्या जागेत जॅक बसविण्यात येतात. त्या जॅकद्वारे हळूहळू सारख्याच अंतराने बंगल्याच्या संपूर्ण भिंती उचलण्यात येतात. एकसमान अंतराने जॅक उचलण्यात येत असल्याने कोणतेही नुकसान होत नाही. त्यानंतर लोखंडी प्लेट बसविण्यात येते. त्यात प्रत्येक जॅकमधील मोकळ्या भागात भिंत बांधण्यात येते त्यानंतर एकेक जॅक काढून टाकण्यात येतो व बंगल्याचा संपूर्ण भार नवीन बांधलेल्या फाऊंडेशनवर येतो.