चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

रांची : चारा घोटाळ्याशी संबंधित दोरांडा कोषागारातून बेकायदेशीर पैसे काढल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यांना दहा लाख रुपयाचा दंड भरावा लागणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांचा जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या वकिलांनी सांगितले की, चारा घोटाळ्याशी संबंधित दोरांडा कोषागारातून बेकायदेशीरपणे पैसे काढल्याप्रकरणी लालू प्रसाद यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २१ फेब्रुवारी रोजी पाच वर्षांचा तुरुंगवास आणि ६० लाखांचा दंड ठोठावला होता. झारखंड उच्च न्यायालयाने अर्धी शिक्षा पूर्ण केल्याने आणि आरोग्याच्या समस्यांमुळे लालू प्रसाद यादव यांचा जामीन मंजूर केला. मात्र, लालू प्रसाद यादव यांना १ लाख रुपयांची सुरक्षा ठेव आणि १० लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

लालू यादव यांच्यावर चारा घोटाळ्याचे एकूण पाच गुन्हे दाखल झाल्याने ते शिक्षा भोगत होते. या शिक्षेविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अपील करून जामीन अर्ज दाखल केला होता. अर्धी शिक्षा भोगल्यानंतर आणि प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागितला होता. लालू प्रसाद सध्या दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार घेत आहेत.

Share