बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे निधन

पुणे : थोर समाजसुधारक प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांची कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी श्रीमती संजीवनी करंदीकर यांचे आज शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या.

संजीवनी करंदीकर या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सख्ख्या बहीण होत्या. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्या आत्या तर शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस किर्तीताई फाटक यांच्या मातोश्री होत. संजीवनी करंदीकर यांच्या पश्चात मुलगी किर्ती फाटक, स्वाती सोमण, जावई, नातवंडे असा परिवार आहे. संजीवनी करंदीकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काल पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते;पण आज सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज सायंकाळी पाच वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्व. संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे पुण्यात गेली. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियामध्ये ३८ वर्षे मशीन सेक्शन अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या नेत्यांसह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

”स्वाभिमानाने जीवन कसं जगावं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आई होती, तिने एक डायरी केली होती, ज्यात तिने अत्यसंस्काराची देखील तजवीज करून ठेवली होती, आम्हाला कसलाही त्रास होऊ नये याची तिनं काळजी घेतली होती. तिचं आयुष्यंच प्रेरणादायी होतं, अशा भावना संजीवनी करंदीकर यांची मुलगी आणि शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस किर्ती फाटक यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

Share