गव्हाच्या किंमती वाढल्यामुळे निर्यातीवर बंदी; मोदी सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किंमती वाढल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. देशातील गव्हाच्या वाढत्या किमती पाहता मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता गहू मुक्त श्रेणीतून प्रतिबंधित श्रेणीत ठेवण्यात आला आहे.

परकीय व्यापार महासंचालनालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, देशाची अन्न सुरक्षा लक्षात घेऊन भारत सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी शेजारी देश आणि गरीब देशांना मदत करण्यासाठी हे करणे आवश्यक होते. मात्र, गरजू देशांना गव्हाची निर्यात सुरूच राहील. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात गव्हाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. भारतातही गव्हाच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. अनेक मोठ्या राज्यांमध्ये सरकारी खरेदीची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असून, लक्ष्यापेक्षा खूपच कमी गव्हाची खरेदी झाली आहे. याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) बाजारात जास्त भाव मिळत आहे. तसेच यावेळी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक कारणांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गव्हाच्या किमतीत अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे भारतासह शेजारी देश आणि इतर अनेक देशांच्या अन्नसुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यामुळे सरकारला गव्हाची निर्यात थांबवावी लागली आहे. गहू मुक्त श्रेणीतून प्रतिबंधित श्रेणीत हलवण्यात आला आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांत गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे या दोन्ही देशातून गव्हाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किंमतीत जवळपास ४० टक्के वाढ झाली आहे आणि रिटेल बाजारात गहू आणि पीठ दोन्ही महाग झाले आहे. भारतातून गव्हाची निर्यात वाढली आहे.

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. एप्रिल महिन्यातील गहू आणि गव्हाचे पीठ यांचा महागाई दर ९. ५९% इतका होता. हा दर मार्चपेक्षा अधिक होता. जेव्हा की गव्हाच्या खरेदीत ५५ टक्के घट होती. सरकारने गव्हाची एमएसपी २,०१५ रुपये प्रति क्विंटल इतकी केली आहे. व्यापार्‍यांच्या म्हणण्यानुसार, १०५ दशलक्ष टनांच्या तुलनेत यावर्षी देशात ९५ दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुरवठा ठप्प असून, दर वाढू लागले आहेत. कांडला बंदरात गव्हाचा भाव २,५५० रुपये प्रतिक्विंटल आहे. सरकार निर्यात बंद करेल या भीतीने निर्यातदारांनी घाईघाईने माल पाठवण्यास सुरुवात केली होती.

Share